कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसागणिक वाढत आहे. ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. यानंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तरादाखल कारवाईची धमक्या दिल्या जात आहेत. याच दरम्यान पाकिस्तानातून मोठी बातमी आली आहे. सियालकोट, लाहोर आणि अन्य एका शहरातील सैन्याच्या एअर डिफेन्स युनिटचं मोठं नुकसान झालं आहे. लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आले आहे. दुसरीकडे भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूर थांबलं नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या एचक्यू-९ मिसाईल डिफेन्स सिस्टिम युनिट्सचं ड्रोन हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानला एचक्यू-९ मिसाईल डिफेन्स सिस्टिम चीननं दिलेली आहे. लाहोरसोबतच गुजरावाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियांवाली, कराची, मियानो, अटकमध्येही ड्रोन हल्ले झालेले आहेत. काल मध्यरात्री पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करुन अवंतीपुरा, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपुरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदिगढ, नल, फलोदी, उत्तरलाई, भुजसह उत्तर आणि पश्चिम भारतामधील अनेक लष्करी भागांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारतानं एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर करुन पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांचे प्रयत्न निष्प्रभ केल्यानंतर भारतानं पुरावे ताब्यात घेतलेले आहेत.
केंद्र सरकारनं एक अधिकृत पत्रक जारी करत सगळ्या घडामोडींची आणि भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. ‘आज सकाळी भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणांवरील हवाई सुरक्षा यंत्रणा आणि रडार यांना लक्ष्य केलं. भारतानं पाकिस्तानला त्यांच्याच पद्धतीनं उत्तर दिलं आहे. लाहोरमधील एक हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे,’ अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे.
‘आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवरील हवाई सुरक्षा रडार आणि यंत्रणांना लक्ष्य केलं. भारतानं पाकिस्तानला त्यांच्याच पद्धतीनं आणि तितक्याच ताकदीनं उत्तर दिलं. विश्वसनीय माहितीनुसार, लाहोरमधील एक हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त झालेली आहे,’ असं पीआयबीकडून सांगण्यात आलेलं आहे. पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ, राजौरी सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा केल्याची माहितीदेखील देण्यात आलेली आहे.