पंढरपूर : प्रसारमाध्यम न्यूज
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून संपूर्ण राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होणार आहेत. यंदा ही वारी अधिक नियोजनबद्ध आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुरक्षित करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात सात ते आठ किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागतात. काही वेळेस भाविकांना तब्बल ३० ते ३५ तास दर्शनासाठी रांगेत उभे रहावे लागते. याच गर्दीचा गैरफायदा घेत अनेक भाविक रांगेत ठिकठिकाणी घुसखोरी करतात. त्यामुळे वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
यंदाच्या वारीत हे चित्र बदलणार आहे. मंदिर समितीने यावेळी दर्शन रांग सुरक्षित करण्यासाठी ६ फूट उंच जाळ्यांची कुंपणे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आता कुणालाही मधूनच घुसखोरी करण्याचा मार्ग बंद होणार आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर
यावर्षीच्या व्यवस्थापनात आणखी एक विशेष बाब म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. दर्शन रांगेतील गर्दीचे नियंत्रण, सुरक्षा व्यवस्थापन, संशयित हालचालींचे निरीक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत उपाययोजना करण्यासाठी एआय आधारित कॅमेरे व सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहेत.
एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने :
- गर्दीची घनता मोजली जाईल.
- रांगेत अचानक होणारी घुसखोरी किंवा गोंधळ ओळखता येईल.
- आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला त्वरीत सतर्कता संदेश मिळेल.
- वृद्ध, महिला, बालक, अपंग अशा विशेष वर्गांना प्राधान्य देणे शक्य होईल.
प्रशासनाच्या माहितीनुसार, यंदा २४ तास चालणारे विठ्ठल दर्शन सुरळीत करण्यासाठी “स्मार्ट कंट्रोल रूम” स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये एआय डेटावर आधारित माहिती सातत्याने पोलिस, आरोग्य यंत्रणा आणि मंदिर समितीपर्यंत पोहोचवली जाईल.
भाविकांची मोठी सोय
या सर्व तंत्रज्ञानामुळे भाविकांना जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही, गर्दीचा ताण कमी होईल आणि सर्वांना व्यवस्थित दर्शन मिळेल. तसेच तातडीच्या आरोग्यसेवांसाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत.”या वारीत तंत्रज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे,” असे मंदिर समितीचे पदाधिकारी म्हणाले.
दरम्यान, यावर्षी आषाढी वारीच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानाचा चैत्री एकादशी दिवशी पंढरपूर येथील बसस्थानक येथून चाचणी देखील घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रशिक्षित आय.पी.एस अधिकारी अंजना कृष्णन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, विक्रांत गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, ड्रोन आयडीया फोर्चचे एजीएम आशिष माथूर उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षाकाठी पंढरपुरात जवळपास दोन ते अडीच कोटी भाविक येत असतात. आषाढी यात्राकाळात मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी प्रशासनाकडून एक महिना अगोदरच तयारी केली जाते.
—————————————————————————————