पट्टणकोडोली : प्रसारमाध्यम न्यूज
“इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत” या सडेतोड शब्दांत इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे-पाटील यांनी पट्टणकोडोलीतील इतिहासाविषयी जागरूकता निर्माण केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त झालेल्या विशेष व्याख्यानात त्यांनी अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या समाजधर्मी नेतृत्वाची महती सांगितली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पट्टणकोडोली येथे समस्त पुजारी धनगर समाज व संयुक्त बिरदेव चौक यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणादायी व्याख्यानाने झाली. इतिहास अभ्यासक व शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या या व्याख्यानात त्यांनी अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचे विविध पैलू उलगडले.
शाहिरी पोवाड्यांनी रंगली ओव्यांची मेजवानी
दुसऱ्या दिवशी, ३० मे रोजी, ओव्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाहिर सत्यवान गावडे यांनी विविध पोवाडे, ओव्या, लोकगीते सादर करून प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. ऐतिहासिक विषयांवर आधारित त्यांचे सादरीकरण विशेष गाजले.
भव्य रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध रंगसंगतीतील आकर्षक रांगोळ्यांनी परिसर फुलून गेला. स्पर्धकांनी राजमातांचे चित्रण, सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम साधत कला कौशल्याचे दर्शन घडवले.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवती यांचा मोठा सहभाग लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजकांनी परिश्रम घेतले. परिसरात राजमाता अहिल्यादेवींविषयी अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
—————————————————————————————————–
अप्रतिम अशी बातमी..छान कार्यक्रम झाले..5 स्टार ⭐⭐⭐⭐⭐
अप्रतिम अशी बातमी..छान कार्यक्रम झाले..5 स्टार ⭐⭐⭐⭐⭐