कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आज कृषी पर्यटन दिवस. कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीत पर्यटकांना आमंत्रित करून त्यांना ग्रामीण जीवनशैली, शेतीच्या विविध पद्धती, स्थानिक अन्नपदार्थ आणि पारंपरिक संस्कृतीचा अनुभव देणे म्हणजे कृषी पर्यटन होय. हा एक सेंद्रिय आणि ग्रामीण अनुभव देणारा पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न, तर पर्यटकांना आराम, शिक्षण व मनोरंजन मिळते.
शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन. हा शहरी पर्यटक आणि ग्रामीण शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या जोडणारा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच गावातील शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न , रोजगार मिळवून देण्याचा दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. कृषी पर्यटनामुळे ग्रामीण संस्कृती , जीवन आणि वस्तू यांची ओळख शहरी लोकांना होते तर ग्रामीण वस्तूंनाही एक नवीन बाजारपेठ उपलब्ध होते. कृषी पर्यटन संस्कृती , जैवविविधता , पर्यावरण संवर्धनाची मोलाची भूमिका बजावत आहे. कृषी पर्यटन ही नव्याने उदयाला आलेली संकल्पना असून १६ मे हा कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रात आजमितीला साधारण ७०० ते ७५० कृषी पर्यटन केंद्रे आहेत.
राज्यात कृषी पर्यटनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीशिवायही उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कृषी पर्यटन धोरणानुसार, शेतकरी आता पर्यटकांना आपल्या शेतावर बोलावून शेती, पशुपालन, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देत आहेत.
राज्य सरकारच्या कृषी पर्यटन धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती पर्यटनासाठी खुली केली आहे. शासनाकडून प्रशिक्षण, अनुदान व मार्केटिंगसाठी मदतही मिळते. महाराष्ट्र कृषी पर्यटन विकास संस्थेच्या (ATDC) मार्गदर्शनाखाली शेतकरी यशस्वी व्यवसाय उभारू शकत आहेत.
शहरी भागातील लोकांसाठी हे पर्यटन केवळ विश्रांतीचा अनुभव नसून, मुलांसाठी शिक्षणात्मक अनुभव ठरत आहे. मुलांना निसर्ग, शेती आणि गावाकडील संस्कृतीची जवळून ओळख होते.
- कृषी पर्यटन केंद्राची संकल्पना कशी असाव
- कृषी पर्यटन हा शेतीपूरक आणि पर्यावरण पूरक व्यवसाय असावा. साधारण शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात असावा. कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते. एक एकर एवढ्या कमी जागेत निसर्गपूरक कृषी पर्यटन केंद्र उभारले जाऊ शकते. केंद्राच्या ठिकाणी शेती संबंधित अवजारे , ग्रामीण वस्तू पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवाव्यात त्यांना त्याविषयी माहिती करू दयावी.
- पर्यटकांची राहण्याची व्यवस्था पर्यावरणपूरक खोल्यांमध्ये असावी. गवत , बांबू ,ताटी यांसारख्या वस्तू वापरून झोपडीसारख्या खोल्या बांधाव्यात. पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना तंबू किंवा मचाण यांसारख्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. पर्यटक हे विशेष करून शहरी भागातले असल्याने त्यांना ग्रामीण परिसराची माहिती नसते त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संभाव्य धोके आहेत ते टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
- पर्यटकांना जेवणासाठी घरगुती पद्धतीचे अस्सल गावरान आणि स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत.
- पर्यटन केंद्राच्या आवारात किंवा परिसरात निरनिराळी पिके व औषधी वनस्पती यांची लागवड करावी. म्हणजे पर्यटकांना त्या गोष्टींविषयी माहिती देखील होईल आणि शेतातील ताजा भाजीपाला , फळे , औषधी वनस्पती पर्यटक खरेदी करू शकतील.
- पर्यटकांना हुतूतू , विटीदांडू , लगोरी यांसारख्या ग्रामीण खेळांची माहिती करून देणे व ते खेळ त्यांना खेळायला शिकवणे. याशिवाय पर्यटकांना केंद्राच्या आसपासच्या परिसरातील पर्यटन केंद्रेही दाखवावीत.
- पर्यटकांना मनोरंजनासाठी लेझीम , जागरण , गोंधळ , वासुदेव, गारुड्याचा खेळ, डोंबाऱ्यांचा खेळ ,आदिवासी नृत्य यांसारख्या ग्रामीण व पारंपारिक मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था करून द्यावी . जेणेकरून या स्थानिक कलाकारांनाही रोजगार मिळेल व ग्रामीण लोककलेचेही संवर्धन होईल. ग्रामीण भागातील शेती, निसर्ग, पशु-पक्षी, संस्कृती आणि जीवनशैली याचे शहरी भागातील लोकांना आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे विरंगुळा किंवा क्षणभर विश्रांती म्हणून शहरी लोक आता ग्रामीण भागाकडे पर्यटन केंद्र म्हणून पाहू लागले आहेत.
कृषी पर्यटनात काय अनुभवता येते ?
| अनुभव | उदाहरण |
|---|---|
| बैलगाडी किंवा ट्रॅक्टर राइड | शेतावर फेरफटका |
| भात किंवा कांदा लागवडीचे प्रात्यक्षिक | स्वतः हाताने काम करणे |
| गोठा व गुरेढोरे पाहणे | दुध काढणे, चाऱ्याचे व्यवस्थापन |
| स्थानिक पदार्थांचा आस्वाद | झुणका-भाकरी, पिठलं-भाकरी, ताक |
| हस्तकला कार्यशाळा | गोधडी शिवण, मातीच्या भांड्यांचे काम |
| गावचे खेळ | लगोरी, फुगडी, भातुकली |
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषी पर्यटन स्थळे :
- बारामती (पुणे) – बारामती अॅग्रो टूरिझम डेव्हलपमेंट सेंटर
- पळसण (पालघर) – Agritourism India
- अंजनवेल, रत्नागिरी – नारळ, केळी आणि आंब्याची शेती
- नाशिक जिल्हा – द्राक्ष शेती व वाईन टूरिझम
- पाटण, सातारा – सह्याद्रीच्या कुशीत ग्रामसंस्कृती अनुभव
महाराष्ट्र शासनाने २०२० मध्ये “कृषी पर्यटन धोरण” जाहीर केले. यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण, अनुदान, जाहिरात व मार्केटिंगसाठी सहकार्य केले जाते. महाराष्ट्र कृषी पर्यटन विकास संस्था (Agri Tourism Development Corporation – ATDC) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.



