मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाने राज्यात माझी लाडकी सून उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यामुळे राज्यातील शोषित आणि पीडित सुनांना मदत दिली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
शिंदे सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर चांगला फायदा झाला. राज्यातील महिलांचे पाठबळ महायुतीला मिळाल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली. महिलांचा उदंड प्रतिसाद या योजनेला मिळाल्यानंतर आता राज्यातील सुनांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माझी लाडकी सून उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला विशेषता आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. मात्र अनेक महिलांना कौटुंबिक हिंसाचार आणि शोषणाला बळी पडावे लागते.
हुंड्यासाठी बळी गेल्याचे पुण्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेचे प्रकरण ताजे आहे. हे प्रकरण प्राचीनिधीपासून अशी शेकडो प्रकरणे महाराष्ट्रात घडत आहेत. महिलांचा विविध स्तरावर होणारा छळ आणि शोषण रोखण्यासाठी आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लाडकी सून उपक्रम आम्ही राबवत आहोत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यासाठी आम्ही केंद्र स्थापन करीत असून ज्या महिलांना कौटुंबिक हिंसाचार अथवा छळाला सामोरे जावे लागते अशा सर्व महिलांना कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर मदत करण्यात येणार आहे. हा उपक्रम लवकरच राबवणार असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.



