हॉटेल मोटेलची तक्रार आल्यास एसटी अधिकाऱ्यांवर कारवाई : नवी आचारसंहिता लागू

0
140
Transport Minister and Chairman of ST Corporation Pratap Sarnaik
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज

लांब पल्ल्याच्या प्रवासा दरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल मोटेलची तक्रार आल्यास आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. एस. टी. च्या अधिकृत थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधाबाबत राज्य परिवहन महामंडळाने नवी आचार संहिता लागू केली आहे. नव्या आचारसंहितेमुळे हॉटेल मोटेल मालकांच्या मनमानीला चाप लागणार आहे. शिवाय, महसूल वाढीच्या दृष्टीने देखील ही आचारसंहिता फायदेशीर ठरणार आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला अचानक भेट दिली. दरम्यान, तेथील प्रवाशांच्या सोयी -सुविधा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच १५ दिवसांत सर्वेक्षण करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने तत्काळ एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्या बाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे. 
नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देत असताना ती ३ वर्षासाठी दिली जाईल परंतु १ वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरील सेवा- सुविधाचा फेर आढावा घेऊन पुढील २ वर्षाच्या मुदत वाढी बाबत विचार केला जाणार आहे. तसेच या हॉटेल थांब्याची निवड करताना तेथील स्वच्छता, अन्नपदार्थ दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्याने विचार केला जावा, असे देखील निविदा प्रक्रियेत नमूद केले जाणार आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

हॉटेल थांब्याची शिफारस संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वस्तुस्थितीजन्य अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी द्यावी. तसेच भविष्यात अशा थांब्या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर जबाबदारी निश्चित करुन कडक कारवाई करावी.

संबंधित हॉटेल मालकांनी महामंडळाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर एफ. आय. आर. देखील दाखल केला जाईल अशी तरतूद केली आहे. तसेच मार्ग तपासणी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी या हॉटेल थांब्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील मध्यवर्ती कार्यालयाने दिल्या आहेत. प्रवाशांना योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या हॉटेल थांब्याची निवड करावी, तसेच त्यातून एसटी महामंडळाचा महसूल देखील वाढवा अशा दुहेरी उद्देशाने नवे हॉटेल- मोटेल धोरण एसटी महामंडळाने जारी केले आहे.

——————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here