कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक नद्या तुडुंब भरल्या असून रत्नागिरी, खेड, चिपळूनसह अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सुमारे १० लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
मुंबईत परिस्थिती गंभीर
मुंबई आणि उपनगरांत मिठी नदीची पाणीपातळी वाढत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. हवामान खात्याने मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट दिला आहे. सरकारने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुरु आहे, याचबरोबर धरणे भरल्याने धरणातील पाणी सोडल्याने ओढे, नद्यांना पूर आला आहे. अतिपावसामुळे नदीकाठच्या घरात पाणी शिरले आहे. नांदेड जिल्ह्यातील जनावरे वाहून गेले आहेत. काही जिल्ह्यांत जीवितहानी झाली असून, अचूक आकडेवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे.
आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार असून त्यानंतर दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक होणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांचे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
अजित पवार यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की – बाधित गावांमध्ये बोटीद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. पंचनाम्यांची कामे सुरू होणार. प्रत्येक धरणावर कार्यकारी अभियंता किंवा तत्सम दर्जाचा अधिकारी तैनात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेजारील राज्यांशी समन्वय साधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाची ताजी माहिती घेतली जात आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोणीही घाबरू नये. बाधित लोकांना तातडीची मदत पुरवली जात आहे,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
——————————————————————————————————