मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
बॉलिवूडमधील शांत, संयमी आणि कुटुंबकेंद्री अभिनेता अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनने अखेर आपल्या आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या नात्याविषयी चाललेल्या अफवांवर मौन सोडलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्याबाबत विभक्त होणार, एकत्र राहत नाहीत, अशा अफवा आणि चर्चांना उधाण आलं होतं. मात्र दोघांनी यावर कधीच भाष्य केलं नव्हतं. अखेर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने याविषयी आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या.
“पूर्वी माझ्याबद्दल काहीही लिहिलं गेलं तरी त्याचा माझ्यावर परिणाम होत नव्हता. पण आता मी एक पती, एक बाप आहे. माझं कुटुंब आहे. त्यांच्याशी संबंधित खोट्या बातम्या वाचून मी अस्वस्थ होतो,” असं अभिषेक म्हणाला.
माध्यमांमधील सनसनाटीपणावरही अभिषेकने परखड मत मांडलं. तो म्हणाला, “लोक नकारात्मक गोष्टींना जास्त आकर्षित होतात. मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी लोक ऐकणार नाहीत. त्यांना फक्त चर्चेचा विषय हवा असतो.”
याच मुलाखतीत अभिषेकने सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयीही एक अनुभव शेअर केला. एका प्रसंगी एका ट्रोलने त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर अत्यंत अपमानास्पद कमेंट केली होती. यावर त्याचा मित्र आणि अभिनेता सिकंदर खेरने संतप्त प्रतिक्रिया दिली आणि त्या ट्रोलला थेट समोर येण्याचं आव्हान दिलं.
अभिषेक म्हणाला, “डिजिटल जगात बसून कोणीही काहीही लिहितं. पण तुम्ही समोर येऊन तेच बोललात, तर मी तुमचा आदर करीन. कारण त्यात प्रामाणिकपणा असतो.”
अभिषेकच्या या प्रामाणिक आणि थेट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला ट्रोलिंगच्या जगात अभिषेक संयम राखून, पण ठामपणे आपली भूमिका मांडताना दिसतो आहे. त्यामुळे त्याच्या या परखड उत्तराने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
———————————————————————————————-