spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeधर्महिंदू - मुस्लीम समाजाचे एक आगळवेगळ ऐक्य

हिंदू – मुस्लीम समाजाचे एक आगळवेगळ ऐक्य

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

हिंदू व मुस्लीम समाजाचे एक आगळवेगळ ऐक्य राजस्थानातील कोटा शहरात पहायला मिळाले. धर्म, जात, रूढी, परंपरा यापलीकडे जाऊन या दोन मित्रांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी एकच निमंत्रण पत्रिका छापली शिवाय या दोघांचे स्वागत समारंभ एकत्रच  घेतले. राजस्थानमधील कोटा शहरात राहणारे विश्वजित चक्रवर्ती आणि अब्दुल रऊफ अन्सारी हे दोघे मित्र. त्यांची मैत्री केवळ चाळीस वर्षांची आहे. त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या निमित्ताने दिलेल्या सलोखा आणि बंधुभावाचा संदेश, त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

अब्दुल रऊफ अन्सारी यांचा मुलगा युनूस परवेझ आणि विश्वजीत चक्रवर्तींचा मुलगा सौरभ यांचा नुकताच विवाह झाला. दोघांसाठी एकच निमंत्रणपत्रिका छापून एकाच स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.’युनूस वेड्स फरहीन’ आणि ‘सौरभ वेड्स श्रेष्ठा’ या दोन्ही नावांचा एकाच निमंत्रण पत्रिकेत समावेश होता. पत्रिकेत युनूसच्या लग्नाच्या ‘इस्तकबाल’ कार्यक्रमात विश्वजीत आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव होते. तर सौरभच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत अब्दुल रऊफ अन्सारींच्या कुटुंबीयांचा समावेश होता.

ईद असो की दिवाळी एकत्रच सण साजरे

कोटा जंक्शनजवळील जनकपुरी कॉलनीमध्ये अब्दुल रऊफ अन्सारी आणि विश्वजीत चक्रवर्ती यांचं घर आहे.सुमारे चाळीस वर्षांपासून दोघं मित्र आहेत. ईद असो की दिवाळी प्रत्येक सण ते एकत्र साजरे करतात. युनूसच्या निकाहमध्ये सौरभ आणि सौरभच्या वरातीत युनूस नाचला. विश्वजीत म्हणतात, “आम्ही एकच निमंत्रण पत्रिका छापली. कारण आमच्या मुलांमध्ये काही फरक नाही. आम्ही दोन नाही तर एकाच कुटुंबाचा भाग आहोत. नातेवाईकही एकमेकांना चांगलं ओळखतात.”अब्दुल रऊफ अन्सारी म्हणाले, “आम्ही काही विचार करून नाही, तर कुटुंबाचा भाग म्हणून एकच कार्ड छापलं. यामुळे आमचा आनंद आणखी वाढला.”

“लग्नाची पत्रिका छापणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मी पहिल्यांदाच असं कार्ड छापत आहे. त्याने काही प्रती त्याच्या रेकॉर्डसाठी स्वत:कडे ठेवल्या आहेत. जे लोक आम्हाला ओळखतात, त्यांना याचा खूप आनंद झाला आहे,” असंही ते म्हणाले.

यूनुस परवेज म्हणतो, “आमच्या मोठ्या भावाच्या लग्नातही पत्रिकेवर मोठ्या वडिलांचे म्हणजे विश्वजीत यांचं नाव इस्तकबालमध्ये होतं. ते माझ्या काकांसारखे आहेत, हे आमच्या सर्व परिचितांना ठाऊक आहे.”

अब्दुल रऊफ आणि विश्वजीत एकमेकांना मित्र नाही, तर भाऊ मानतात. त्यांचे कुटुंबीय देखील स्वतःला वेगळं मानत नाहीत. विश्वजित चक्रवर्ती सांगतात, “आम्ही सुरुवातीपासून एकत्र आहोत, आम्ही कधी मोठे झालो ते कळलंही नाही. आमची लग्नंही झाली. घरं ही आम्ही जवळच बांधली, एकत्र व्यवसाय करतो आणि आम्ही मित्र नाही, भाऊ आहोत.”‘आमचे नातेवाईक एकमेकांना ओळखतात आणि आमचे मित्रही कॉमन आहेत. आमची मुलंही भाऊ-बहिणींसारखी राहतात. दोन दिसतात, पण आम्ही एकाच कुटुंबाचे आहोत,'” असं अब्दुल रऊफ अन्सारी म्हणाले.

अजमेरच्या केकडी येथील सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक जसवंत सिंग राठोड, हे अन्सारी आणि चक्रवर्ती यांचे कॉमन मित्र आहेत.

ते सांगतात, ‘2010 मध्ये मी कोटा येथे इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होतो, तेव्हापासून दोन्ही कुटुंबांशी माझा स्नेह जुळला. त्यांची नावं वेगळी आहेत, पण कुटुंब एकच आहे. यांची मैत्री आदर्श आहे.'”

जेव्हा देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून हिंदू-मुसलमानांमधील तणावाच्या बातम्या येतात, तेव्हा त्याचा या मैत्रीवर काही परिणाम होतो का? असं विचारल्यावर अब्दुल रऊफ म्हणतात, “आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही त्याबद्दल विचारही करत नाही. आम्ही फक्त एक कुटुंब आहोत आणि सर्वांनी असंच एकत्र राहायला हवं.”

यूनुस म्हणतो, “आमच्या मित्रांमध्ये कधीच धर्म किंवा जात यामुळं अडथळा आला नाही. आम्ही खूप प्रेमाने राहतो. सौरभ आणि मी नेहमी एकत्रच राहिलो आहोत.”

त्यांच्या मैत्री आणि कुटुंबातून काय संदेश देऊ इच्छिता, असं जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा अब्दुल रऊफ अन्सारी म्हणाले, “जसं आम्ही एक कुटुंब म्हणून प्रेमाने राहतो, तसंच सगळ्यांनीही प्रेमाने आणि एकत्र राहिलं पाहिजे.”

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments