कृष्णात चौगले : कोल्हापूर
मिसळ म्हटलं की सर्वसामान्यपणे डोळ्यांसमोर येतो तिखट रस्सा, उसळ आणि फरसाण यांचा सुरेख संगम. त्यासोबत बारीक कांदा. कोल्हापूरकरांचे हे आवडते खाद्य. यासाठी काळ वेळ बघितला जात नाही. पण, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एक वेगळीच चव आपली खास ओळख निर्माण करत आहे ती म्हणजे दूध-मिसळ !
हे ऐकून थोडं वेगळं वाटू शकतं, पण दूध-आमटी किंवा दूध-सार हे खाद्यपदार्थ राधानगरीच्या शाकाहारी जेवणात अनेक वर्षांपासून रुजले आहेत. याच परंपरेत नवकल्पना मिसवून काही स्थानिकांनी पर्यटक व खवय्यांसाठी ‘दूध-मिसळ’ ही संकल्पना विकसित केली आहे.
या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे ताजे गरम दूध-सार, त्यात फरसाण आणि बाजूला ब्रेड किंवा पाव. चव मात्र अशी की, एकदा चाखली की विसरणं कठीण ! विशेषतः पावसाळ्यात गरमागरम दूध-सारात भिजलेलं फरसाण आणि त्याबरोबर ब्रेड/पाव ही अनुभूती खरीच वेगळी आहे.
चविष्ट अनुभव :
राधानगरीमध्ये अनेक ठिकाणी ही मिसळ उपलब्ध आहे. राधानगरी शहरातील बहुतांश हाॅटेलमध्ये याचा आस्वाद घेता येईल. दूध-सार स्वतःच अतिशय चवदार असून, त्यात फरसाण घालण्याचा आनंद प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. काही जण फक्त दूध-सार आणि पाव या साध्या कॉम्बिनेशनलाच प्राधान्य देतात. पण कोणताही प्रकार निवडला, तरी ही चव नक्कीच लक्षात राहणारी आहे.
तुम्हीही राधानगरीला गेलात तर दूध-मिसळ नक्की चाखा. स्थानिक परंपरेची आणि नावीन्यपूर्ण प्रयोगाची चव एकत्र अनुभवायला मिळेल !
आमच्या यूब ट्यूब चॅनेललाही भेट द्या…👇