आज, १६ सप्टेंबर.. मराठी साहित्यविश्वातील थोर कवी, गीतकार आणि समाजमनाशी घट्ट नाळ असलेले व्यक्तिमत्त्वना. धों. महानोरयांची जयंती. “ रानकवी ” म्हणून ओळखले जाणारे महानोर यांनी आपल्या कवितांद्वारे निसर्ग, ग्रामीण जीवन, शेती आणि लोकसंस्कृतीचे अस्सल चित्र शब्दांमध्ये उभे केले. त्यांच्या लेखणीला बालकवींच्या शैलीचा प्रभाव असून त्यांनी बहिणाबाईंच्या गाण्याचा वारसा पुढे नेला.
जन्म आणि प्रारंभिक जीवन
त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद ( सध्याच्या छत्रपती संभाजीनगर ) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळसखेड या गावात झाला. त्यांनी शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे घेतले आणि पुढे जळगाव येथे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडून ते पुन्हा गावात शेती करण्यासाठी परतले आणि शेती करत असतानाच कविता लेखनास प्रारंभ केला.
साहित्याची दिशा आणि योगदान
त्यांच्या कवितांमध्ये मराठवाड्यातील लोकजीवनाचा खजिना खुला झाला. ‘रानातल्या कविता’, ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘पळसखेडची गाणी’, ‘पावसाळी कविता’, ‘अजिंठा’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’ अशी अनेक पुस्तकं आणि कवितासंग्रह गाजले. ‘दूरच्या रानात केळीच्या वनात’ हे त्यांच्या लेखणीतून जन्मलेले गीत आजही लोकप्रिय आहे.
त्यांनी बहिणाबाईंच्या परंपरेला नवी दिशा देत लोककवितेला नवा अभिजातपणा प्रदान केला. निसर्गाशी संवाद साधणाऱ्या त्यांच्या कविता वाचकांच्या मनात खोलवर रुजल्या.
मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अनेक गीतं लिहिली. ‘ एक होता विदुषक ’, ‘ जैत रे जैत ’, ‘ दोघी ’, ‘ मुक्ता ’, ‘ सर्जा ’ यांसारख्या चित्रपटांना त्यांच्या गीतांनी विशेष रंगत दिली. त्यांच्या गीतांनी ग्रामीण संस्कृती आणि मनःस्थितीला स्वर दिला.
१९७८ साली त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती झाली. शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध निर्माण झाला. या आठवणींवर आधारित ‘शरद पवार आणि मी’ आणि ‘यशवंतराव चव्हाण आणि मी’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
जलसंधारण, ठिबक सिंचन आणि फळबाग यांसारख्या योजनांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले आणि शेती क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या.औदुंबर साहित्य संमेलन, पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन, ई-साहित्य संमेलन, जलसाहित्य संमेलन आणि यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांना आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार मिळाला.
त्यांचे निधन ३ ऑगस्ट २०२३ रोजी पुण्यात झाले, तरी त्यांच्या कविता आणि कार्य आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या शब्दांनी ग्रामीण जीवनाचे सौंदर्य आणि संघर्ष दोन्ही जपले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा अभ्यास आणि स्मरण करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
रानकवी ना. धों. महानोर यांचे योगदान मराठी साहित्य आणि समाजासाठी अमूल्य ठरले असून त्यांच्या शब्दांमध्ये अजूनही निसर्गाची गंध, शेतकऱ्याचा संघर्ष आणि लोकसंस्कृतीचे सौंदर्य जिवंत आहे.