महायुती सरकारमध्ये मोठा फेरबदल ?

आठ मंत्र्यांना नारळ, नवे चेहरे मंत्रिमंडळात

0
145
Google search engine

मुंबई | प्रसारमाध्यम वृत्तसेवा

राज्यातील महायुती सरकारमध्ये सगळं आलबेल नसल्याचं संकेत पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेनेच्या सामनातून करण्यात आलेल्या एका सनसनाटी दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सामनामध्ये दावा करण्यात आला आहे की, महायुती सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांना नारळ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, काही वादग्रस्त मंत्र्यांविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. आता सामनामधून आलेल्या या दाव्यामुळे त्या चर्चा पुन्हा एकदा जोरात रंगू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात हा आगामी मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल ‘डॅमेज कंट्रोल’साठी असू शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे, असा दावाही सामनामध्ये करण्यात आला आहे. त्यांच्या जागी, सध्या सरकारविरोधात भूमिका घेत असलेले माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपदी नेमण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुनगंटीवार सध्या भाजपमधील नाराज गटाशी संलग्न असल्याची चर्चाही सुरु आहे.

या बदलामुळे महायुतीच्या अंतर्गत घडामोडींना वेग येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षांतर्गत नाराजी, आगामी निवडणुकांची तयारी आणि लोकांच्या नाराजीचा अंदाज घेत सरकार ही मोठी खेळी करत असल्याची राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीतून एक मोठी माहिती समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीतील संसद भवनात केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली. फडणवीस दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात महत्त्वाच्या भेटीगाठी सुरू आहेत. या सोबतच अनेक महत्त्वाच्या बैठका मुख्यमंत्री घेताना दिसताहेत. राज्यातील राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील मंत्र्यांवर झालेले आरोप आणि कथित हनी ट्रॅपचं प्रकरण असेल किंवा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान असेल त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरकारकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, आगामी काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

—————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here