India has discovered a large natural gas reserve in the Andaman Sea.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अंदमान सागरात भारताला नैसर्गिक वायूचे मोठे भांडार सापडले आहे. पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर ) याची अधिकृत घोषणा केली. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक वायूचा शोध दोन विहिरींमध्ये लागला असून, त्या अंदमान सागराच्या किनाऱ्यापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर आहेत. नैसर्गिक वायूचा साठा समुद्राच्या २९५ मीटर खोलीवर सापडला आहे. या शोधासाठी २६५० मीटर खोदकाम करण्यात आले होते, आणि २९५ मीटर खोदकामानंतरच नैसर्गिक वायूचा साठा सापडला. त्यानंतर २३५५ मीटर खोदकाम केले गेले.
पेट्रोलियममंत्र्यांच्या माहितीनुसार, या ठिकाणी प्राथमिक उत्पादन चाचणीत (Initial Production Testing) नैसर्गिक वायूची पुष्टी झाली, तसेच वेळोवेळी आग लागल्याचेही निरीक्षण झाले. चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये ८७ टक्के मिथेन वायू असल्याचे समोर आले.
भारत सध्या परदेशातून नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणात आयात करत आहे. २०२३-२४ साली देशाला एकूण ४४ टक्के नैसर्गिक वायू परदेशातून आयात करावा लागला होता. मात्र अंदमान सागरातील या नव्या साठ्यामुळे भारताचा फायदा होणार असून, देश उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मोठा पाऊल टाकणार आहे.
विशेषज्ञांच्या मते, हा शोध दीर्घकालीन आर्थिक आणि उर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी हा एक मोठा टप्पा आहे.