कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अण्णाभाऊ साठे एक महान साहित्यिक, समाजसुधारक, लोकशाहीर आणि क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी आयुष्यभर शोषित, पीडित, कामगार, दलित आणि वंचित समाजासाठी लेखणी आणि शब्दयुद्ध चालवलं. त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते. आज त्यांची जयंती. त्या निमित्त त्यांच्या एकूण वाटचालीचा घेतलेला समग्र आढावा.
कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. सांगली जिल्ह्यांतील वाटेगाव येथे ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या मातंग जमातीत त्यांचा जन्म झाला तर त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले.
चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.
उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृध्दीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.
अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे ते म्हणत; आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता. मानवी जीवनातील संघर्ष, नाटय, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली. त्यात बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, यशवंत मनोहर, दया पवार, केशव मेश्राम, शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो.
अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यातील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.
महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिध्द केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत..
रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.
——————————————————————————



