दसरा महोत्सवात संस्कृती, लोककलेचा उत्सव

0
106
A colorful worship program was organized on Thursday as part of the state's major royal Dussehra festival.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्याच्या प्रमुख शाही दसरा महोत्सवांतर्गत गुरुवारी रंगतदार आराधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशातील सात राज्यांतील तब्बल ११७ कलाकारांनी आपल्या लोकपरंपरा आणि लोकनृत्यांचे आकर्षक सादरीकरण करून कोल्हापुरकरांना मंत्रमुग्ध केले.

दसरा चौक येथे संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात विविध लोककला, नृत्यप्रकार आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. या कार्यक्रमाचा दुसरा भाग उद्या, शुक्रवारी सायंकाळी सादर होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील कलाकारांनी आपापली कला या ठिकाणी खुलवली.

कार्यक्रमाची सुरुवात राजस्थानी कलाकारांच्या पारंपरिक चरी नृत्याने झाली. डोक्यावर पेटलेल्या ज्वाळांसह लयबद्ध हालचाली करताना कलाकारांनी कौशल्यपूर्ण सादरीकरण केले आणि वातावरण मंगलमय केले. त्यानंतर सोंगी मुखवटे नृत्याने प्रेक्षकांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आदिवासी लोककलेचा नजराणा अनुभवायला मिळाला. वाईटावर सत्याचा विजय दर्शविणारे हे लोकनृत्य प्रामुख्याने होळी पौर्णिमा आणि विवाह सोहळ्यांत सादर केले जाते.
मध्य प्रदेशातील नर्तकांनी झलरिया आणि मटकी गणगौर नृत्याच्या लयीतून लोककलेतील समृद्धीचे दर्शन घडवले. शिव-पार्वतीच्या विविध प्रतिमांचे चित्रण यातून प्रभावीपणे साकारले गेले. कर्नाटकच्या कलाकारांनी देवी नृत्याच्या माध्यमातून शक्तीची उपासना, भक्तिभाव आणि शौर्यपूर्ण हालचालींचा संगम सादर केला. पश्चिम बंगालच्या कलाकारांनी विशेष वेशभूषा व अलंकारांमधून छऊ नृत्य सादर करत पुराणकथांतील युद्ध आणि वीरतेचे प्रभावी चित्रण केले. नृत्य, संगीत आणि पदन्यास यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. तेलंगणातील दोन विशेष नृत्यप्रकारांनी कार्यक्रमात रंगत भरली. बोनालू नृत्यातून महाकाली देवीची भक्तिभावपूर्ण उपासना प्रकट झाली, तर अखेरीस बथुकम्मा नृत्यातून महिलांनी फुलांच्या सजावटीद्वारे निसर्ग, माता आणि सृजनशक्तीचा गौरव साजरा केला.
या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या मदतीने करण्यात आले. शाही दसऱ्याच्या मंचावर झालेल्या आराधना भाग १ ने प्रेक्षकांना अक्षरशः मोहित केले असून, आता उद्या होणाऱ्या आराधना भाग २ कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे मिलिंद जोशी यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आयरेकर यांनी केले.
दररोजप्रमाणे कार्यक्रमाआधी जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहासी पर्यटन विषयक विविध ठिकाणे, त्यांची वैशिष्ट्ये आणि पर्यटकांनी घ्यावयाची काळजी याबाबत ऋषिकेश केसकर व विनोद कांभोज यांनी माहिती दिली. दिवसभरात शाही दसरा महोत्सवांतर्गत प्लास्टिक मुक्त कोल्हापूरसाठी पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
——————————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here