कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आजोबांनी आजीसाठी काहीतरी खास घ्यायचं ठरवलं होतं. दुकानात आल्यावर त्यांनी कापडी पिशवीतून पैसे काढून देताना त्यांच्यातलं प्रेम ओसंडून वाहत होतं. तोच क्षण एका ग्राहकाच्या रिव्ह्यू शूट दरम्यान व्हिडीओत कैद झाला. पण नंतर निलेश यांनी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा हृदय हेलावून टाकणारी गोष्ट समोर आली.
संभाजीनगरच्या एका छोट्याशा सराफाच्या दुकानात सध्या सोशल मीडियावर लाखोंच्या काळजात घर करणारी गोष्ट घडली. ९३ वर्षांचे आजोबा आपल्या पत्नीसाठी छोटासा दागिना घ्यायला आले… पण त्यांच्या हातातली नोटांची गड्डी आणि चिल्लर पाहून दुकानाचे मालक निलेश खिंवसरा यांच्या डोळ्यांत पाणी आलं.
एक मुलगा वारला… दुसरा व्यसनाधीन
आजोबांनी सांगितलं की, त्यांच्या दोन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला, आणि दुसरा दारूच्या व्यसनात बुडालाय. त्यामुळे आजी-आजोबा दोघांनी मिळून घर सोडून, कुठं तरी एकटं रहायला सुरुवात केली. ही गोष्ट सांगतानाच दोघांचे डोळे भरून आले. त्या अश्रूं मध्ये वर्षानुवर्षांचं दुःख, वेदना, आणि तरीही एकमेकांच्या साथीतलं निस्सीम प्रेम होतं.
“हे प्रेम मी कधीच पाहिलं नव्हतं” – निलेश खिंवसरा
हे सगळं पाहून निलेश खिंवसरा स्वतःही भावुक झाले. त्यांनी त्या आजी-आजोबांना हसवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “पांडुरंग आणि रुख्मिणी भेटलेत मला आज… तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद हवा.” आणि त्यांनी दोघांकडून एकेक १० रुपयांच्या नोटा आठवण म्हणून घेतल्या.
या घटनेनं आजोबांचं प्रेम जितकं लोकांना स्पर्शून गेलं, तितकंच निलेश खिंवसरांनी दाखवलेली माणुसकीही लोकांच्या मनात घर करून गेली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला हजारो शेअर्स, लाईक्स, आणि प्रेमळ कमेंट्स मिळाल्या आहेत.
नेटिझन्स म्हणतात :
“हे खरं प्रेम आहे…”
“माणुसकी अजूनही शिल्लक आहे…”
“निलेशजी, तुम्ही खरे हिरो आहात!”
या गोष्टीतून एका बाजूला वृद्ध आजोबांचं त्यांच्या आजीवरचं अढळ प्रेम दिसतंय, आणि दुसऱ्या बाजूला, व्यवसायाच्या घाईगडीतही माणूसपण जपणारा एक सोनार. हा व्हिडीओ नाही, ही जीवनाची शिकवण आहे. प्रेम, विश्वास आणि माणुसकीची.