अंबोली घाटात दुर्मीळ ‘उडणारा बेडूक’

सहा महिने झोपतो, हवेत उडतो

0
95
Google search engine
आंबोली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेने नटलेले आंबोली नेहमीच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. यावेळी अभ्यासक मोठ्या संख्येने इकडे भेटी देत आहेत. कारण ठरतोय एक दुर्मीळ आणि अद्वितीय प्रजातीचा उडणारा बेडूक ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ (Malabar Gliding Frog). अलीकडेच आंबोलीच्या जंगलात या बेडकाचा थरारक शोध लागला असून, तो अभ्यासक आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरतोय.
हा बेडूक उडणाऱ्या बेडकाच्या वर्गवारीत मोडतो. त्याचे पायांचे बोटे त्वचेच्या पातळ झिल्लीने जोडलेले असतात. यामुळे तो एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर अक्षरशः हवेत तरंगत झेप घेतो. उड्डाण करताना शरीर सपाट व चपटे करून हवेवरचा पृष्ठभाग वाढवतो, त्यामुळे झाडांमधील फांद्यांवर सहज हालचाल करू शकतो. म्हणूनच त्याला ‘ग्लायडिंग फ्रॉग’ म्हणजेच “तरंगणारा बेडूक” असे नाव लाभले आहे.
हा दुर्मीळ बेडूक महाराष्ट्रात कोल्हापूरच्या चांदोली अभयारण्यात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग व आंबोलीच्या जंगलात आढळून येतो. इतर बेडकांप्रमाणेच तो वर्षातील आठ ते नऊ महिने निद्रावस्थेत राहतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला, विशेषतः जून महिन्यात पहिला पाऊस पडताच हा बेडूक जागा होतो आणि त्याचे जीवनचक्र सुरू होते.
या बेडकाचे जीवनचक्र पाहणे म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार अनुभवण्यासारखे आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आंबोलीच्या जंगलात याचे निरीक्षण सहज शक्य होते. यामुळे वन्यजीव अभ्यासक, संशोधक, छायाचित्रकार आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने आंबोलीकडे वळू लागले आहेत.
वन्यजीव अभ्यासक सांगतात, “मलबार ग्लायडिंग फ्रॉग ही प्रजाती अत्यंत नाजूक आणि संवेदनशील आहे. त्यामुळे त्याच्या अधिवासाचे जतन आणि संवर्धन करणं आवश्यक आहे. आंबोलीसारख्या ठिकाणी या प्रजातीचा आढळ हा खूपच महत्त्वाचा आहे.”
या दुर्लभ बेडकाच्या दर्शनामुळे आंबोलीच्या पर्यटनालाही चालना मिळत असून, स्थानिक मार्गदर्शक व पर्यटन व्यावसायिकांना याचा फायदा होऊ लागला आहे. मात्र पर्यटकांनी जबाबदारीने आणि निसर्गाला न दुखावता जंगलातील जैवविविधतेचा अनुभव घ्यावा, अशी विनंती स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.

—————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here