नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून औपचारिक सुरुवात झाली असून पहिल्याच आठवड्यात चर्चेचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर राबविण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’. या चर्चेची पार्श्वभूमी गंभीर आणि संवेदनशील असल्यामुळे दोन्ही बाजूंनी आक्रमक तयारी केली आहे.
लोकसभेत आज आणि राज्यसभेत उद्या ( 29 जुलै ) या विषयावर चर्चा होणार असून, दोन्ही सभागृहांसाठी प्रत्येकी १६ तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. प्रत्यक्ष चर्चेला गोंधळ आणि हस्तक्षेपांमुळे अधिक वेळ लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसकडून व्हीप, वरिष्ठ नेत्यांना चर्चेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता
दहशतवादी हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत काँग्रेसने त्यांच्या सर्व लोकसभा खासदारांना आजपासून पुढील तीन दिवस उपस्थित राहण्याचे ‘व्हीप’ जारी केले आहे. संभाव्य वक्त्यांमध्ये राहुल गांधी, गौरव गोगोई, प्रणिती शिंदे आणि प्रियांका गांधी यांची नावे आहेत. अंतिम यादी आज सकाळी निश्चित होणार आहे.
सत्ताधारी आघाडीकडूनही ताकदीनं प्रत्युत्तर
सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चे दरम्यान गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा सहभाग निश्चित आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या चर्चेत हस्तक्षेप करून दहशतवादाविरोधात त्यांच्या सरकारची ठाम भूमिका मांडू शकतात.
पहिल्या आठवड्यात गोंधळाचे वातावरण
संसदेच्या पहिल्या आठवड्यात बिहारमधील मतदार यादीतील सुधारणा (SIR) व इतर प्रादेशिक मुद्द्यांवर विरोधकांच्या तीव्र निदर्शनांमुळे कामकाज जवळपास ठप्प झाले होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी सोमवार आणि मंगळवारच्या चर्चेसाठी सहमती दर्शवत तीव्र मुद्द्यांवर थेट चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ही माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी २५ जुलै रोजी जाहीर केली होती.
राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण या दोन अत्यंत संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजपासून संसदेतील वातावरण तापणार आहे. सरकारच्या भूमिकेवर आणि कारवाईवर विरोधक कठोर प्रश्न उपस्थित करतील, तर सत्ताधारी आघाडी त्याला तितक्याच ताकदीने उत्तर देईल. त्यामुळे पुढील दोन दिवस संसदेतील घडामोडी राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरू शकतात.
————————————————————————————-