मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रात राजकारणात आज सकाळपासून महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) नेते आणि लोकप्रतिनिधींनी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी राजभवनात महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत महत्त्वपूर्ण निवेदन दिलं आहे. या निवेदनात सरकार मधील वादग्रस्त, बेजबाबदार मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का : ठाकरे गटाची भूमिका
ठाकरे गटाने आपली भूमिका ठामपणे मांडत सांगितले की, “सत्ताधारी मंत्र्यांचे गेल्या काही दिवसांपासूनचे बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तन हे फक्त लोकशाही व्यवस्थेलाच नव्हे, तर विधिमंडळाच्या पावित्र्यालाही गालबोट लावणारे आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. अशा मंत्र्यांना तातडीने सत्तेतून पायउतार करणे आवश्यक आहे.”
सुषमा अंधारे यांची स्पष्ट प्रतिक्रिया
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “सध्याच्या मंत्र्यांचे वर्तन हे अत्यंत बेजबाबदार असून त्यांच्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. त्यामुळेच राज्यपालांची भेट घेऊन आम्ही सरकारमधील अशा मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी केली आहे.”
याचबरोबर अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या ऐतिहासिक भेटीवरही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं, “दुधात साखर पडावी तशी ही भेट घडली आहे. दोन भावांनी एकत्र येणं म्हणजे कुटुंब पुन्हा एकत्र येणं हे जनतेसाठी आश्वासक आहे.”
वादग्रस्त मंत्र्यांची यादी चर्चेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील संजय शिरसाट, भरत गोगावले, दादा भुसे आणि योगेश कदम यांच्यावर वादाच्या झळा आल्या आहेत. त्यांना आगामी संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात ‘नारळ’ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा झाला आहे. आता माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांचीही नावे टांगती तलवार असलेल्या यादीत आहेत.
भाजपमधील मंत्री सुद्धा यातून सुटलेले नाहीत. नितेश राणे ( मत्स्यविकास ) आणि जयकुमार गोरे ( ग्रामविकास ) हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले असून त्यांचेही मंत्रिपद धोक्यात असल्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणे बदलणार ?
या संपूर्ण पार्श्वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनाही पक्षहितासाठी मंत्रिपद सोडण्यास सांगितले जाऊ शकते, अशी शक्यता आहे. याच वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देऊन त्यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्षपदी बसवण्याची शक्यता सध्या चर्चेत आहे.
आजची राजभवन भेट आणि निवेदनाद्वारे ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना थेट भिडण्याची भूमिका घेतली आहे. संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदल, राजकीय संतुलन आणि पक्षांतर्गत अस्वस्थता यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गरम वातावरण तयार झाले आहे. आगामी दिवसांत हे राजकीय वादळ आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
—————————————————————————————————–



