मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महायुती सरकारमध्ये मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये विभागीय अधिकारांवरून सुरू झालेला वाद चांगलाच चिघळलेला दिसतो. सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीवरून उडालेल्या मतभेदानंतर मंत्री संजय शिरसाठ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात थेट पत्रव्यवहार झाला. या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे कौतुक करत, समन्वयातून काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
मात्र, या वादावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत म्हटलं, “संजय शिरसाठ यांना लवकरच गाशा गुंडाळावा लागणार, असेच हे संकेत आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वादावर नव्या चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील सरकारवर निशाणा साधला. “ नाइलाजाने झालेली महायुती दिसतेय. प्रत्येकाला वाटतं मीच मुख्यमंत्री होईन. त्यामुळे कोणी कोणाचे ऐकत नाही. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न करत म्हटलं, “राज्यमंत्र्यांना काही अधिकार देण्याबाबत सध्या सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत की, आपल्या विभागात राज्यमंत्र्यांना कोणते अधिकार देता येतील, याचा सविस्तर आराखडा तयार करावा.”
या साऱ्या घडामोडींनी महायुती सरकारमधील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मंत्री आणि राज्यमंत्र्यांमधील अधिकारवाटपाचा मुद्दा अधिकच ठळकपणे पुढे येतो आहे. आगामी काही दिवसांत मुख्यमंत्री यावर निर्णायक पाऊल उचलतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————————