अलिगढ : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत असतानाच, उत्तर भारतातून एक आशादायी चित्र समोर येत आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात (AMU) उत्तर भारतातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मराठी भाषा शिकत आहेत. या विद्यापीठात मराठी विषयासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शेकडो विद्यार्थी मराठीचे औपचारिक शिक्षण घेत आहेत.
रोजगार आणि संधीच्या दिशेने एक पाऊल
महाराष्ट्र, विशेषतः मुंबई हे भारताच्या आर्थिक विकासाचे केंद्र मानले जाते. रोजगार, व्यवसाय आणि करिअरच्या असंख्य संधींसाठी देशभरातून तरुण मुंबईकडे आकर्षित होतात. हेच लक्षात घेऊन, अनेक विद्यार्थी मराठी भाषेचं ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना वाटते की, स्थानिक भाषेचं ज्ञान असल्यास महाराष्ट्रात वावरणं, शिकणं आणि नोकरी मिळवणं अधिक सोयीचं ठरेल.
मराठी शिकण्यामागील प्रेरणा
मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी सांगितलं की, “आम्हाला महाराष्ट्रात नोकरी करायची आहे. मुंबईसारख्या शहरात मराठी येणं हे खूप महत्त्वाचं ठरतं.” तर काहींनी साहित्याची आवड, मराठी चित्रपट आणि संगीत यामुळेही भाषेची गोडी लागल्याचं नमूद केलं.
शिक्षकांचं मत
अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मराठी विभागाचे एक प्राध्यापक म्हणाले, ” मुलांमध्ये मराठी शिकण्याची उत्सुकता वाढत आहे. ही केवळ रोजगाराची तयारी नाही, तर एक सांस्कृतिक पूल निर्माण करण्याची सुरुवात आहे. महाराष्ट्राची संस्कृती, भाषा आणि परंपरा यांचं आकर्षण विद्यार्थ्यांना भुरळ घालतं आहे.”
समाजात सकारात्मक संकेत
हे चित्र महाराष्ट्रातील समाजासाठी आणि भाषिक सलोख्यासाठी एक सकारात्मक संदेश देणारं आहे. ज्या काळात भाषावादाने सामाजिक ताप वाढतो आहे, त्या काळात इतर राज्यांतील युवकांनी मराठी शिकणं ही समंजस आणि प्रगल्भ मानसिकतेची खूण मानली जात आहे.
मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर ती देशाच्या विविध भागांतील तरुणांसाठी संधींचं एक दार ठरते आहे. अलिगढसारख्या उत्तर भारतीय शहरात मराठी शिकण्याची वाढती प्रवृत्ती पाहता, भाषिक एकतेचा आणि समजूतदारपणाचा एक नवा अध्याय सुरू होत असल्याचं स्पष्ट दिसून येतं आहे.
———————————————————————————————-