
कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाचे लोकार्पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात जिल्ह्याच्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा जोरदार शंखनाद करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना कोल्हापुरातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “कोल्हापूर हा आमचा बालेकिल्ला होता आणि पुन्हा एकदा होतोय. जिल्हा कार्यालय हे केवळ इमारत नाही तर शिवसेनेच्या जनसंपर्काचं, जनविश्वासाचं आणि जनसंवादाचं केंद्र ठरेल. येथून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक समस्येला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.”
शिवसेना हा कोल्हापुरातील सर्वात मोठा पक्ष :आबिटकर
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – आज कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत. एक माजी आमदार आणि खासदार देखील आमचाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जिल्ह्याचा पालकमंत्री देखील शिवसेनेचाच आहे.”
ते पुढे म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी मी एकटा शिवसेनेचा आमदार होतो, तेव्हा सहा आमदार आणि दोन खासदार दुसऱ्या पक्षाचे होते. त्या वेळी माझी अवस्था काय होती हे सांगण्यासारखं नव्हतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापुरात शिवसेना खऱ्या अर्थाने उभी राहिली.”
दररोज एक लोकप्रतिनिधी कार्यालयात
या कार्यालयातून जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेता यावेत म्हणून पालकमंत्री आबिटकर यांनी दररोज एका लोकप्रतिनिधीने या कार्यालयात उपस्थित राहावं, असं आवाहन केलं. जनतेशी थेट संपर्क ठेवण्याचा हा उपक्रम आता जिल्हा पातळीवर शिवसेनेच्या बांधणीस बळ देणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेनेचे विविध स्तरांवरील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर, करवीरचे आमदार चंद्रजीत नरके, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने तसेच माजी खासदार संजय मंडलिक आदींचा समावेश होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनिती
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागात संघटन बळकट करून शिवसेना सर्व जागांवर लढेल, अशा तयारीचं चित्र यावेळी स्पष्टपणे उभं राहिलं.
आजच्या कार्यक्रमाने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या राजकीय पुनरागमनाला अधिक अधिकृत आणि ठोस स्वरूप मिळालं. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून, स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना ‘नंबर वन’ असल्याचं पक्षाच्या नेतृत्वाने ठामपणे मांडलं आहे.






