नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत देशातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची यशस्वी चाचणी केली आहे. चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये पार पडलेली ही चाचणी भारताच्या हरित ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञानाच्या दिशेने टाकलेलं निर्णायक पाऊल ठरत आहे.
काय आहे खास ?
ही चाचणी ड्रायव्हिंग पॉवर कार नावाच्या कोचवर करण्यात आली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः ही माहिती ट्विटरद्वारे शेअर केली. भारत नेहमीच पर्यावरणपूरक आणि भविष्यातील ऊर्जा तंत्रज्ञानाच्या शोधात पुढे राहिला आहे, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.
वेगळेपण काय ?
हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन पूर्णतः हरित तंत्रज्ञानावर आधारित आहे.
-
पारंपरिक डिझेल आणि विजेवर चालणाऱ्या गाड्यांप्रमाणे यामधून धूर किंवा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होत नाही.
-
हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या अभिक्रियेतून ऊर्जा निर्माण होते.
-
परिणामी, या ट्रेनद्वारे प्रदूषणाचा धोका जवळपास शून्यावर येतो.
खर्च किती ?
-
२०२३ मध्येच अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत माहिती दिली होती की, रेल्वे विभाग ३५ हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखत आहे.
-
प्रत्येक ट्रेनसाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
-
याशिवाय, उत्तर रेल्वेच्या जींद-सोनीपत खंडावर डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटला हायड्रोजन फ्युएल सेलमध्ये रूपांतर करण्यासाठी १११.८३ कोटींची पायलट योजना सुरू करण्यात आली आहे.
वैष्णव म्हणाले, ” सुरुवातीला या तंत्रज्ञानाचा खर्च जास्त वाटू शकतो. पण कालांतराने यामध्ये बचत आणि स्थिरता येईल. हे केवळ रेल्वेसाठी नाही, तर भारताच्या शून्य कार्बन उत्सर्जनाच्या ध्येयासाठीही महत्त्वाचं पाऊल आहे.”
भारतीय रेल्वेच्या या प्रयत्नामुळे देश हरित ऊर्जेच्या जागतिक मंचावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. हायड्रोजन ट्रेन हे केवळ तांत्रिक यश नाही, तर भविष्यातील स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत प्रवासासाठी उभारलेली मजबूत पायाभरणी आहे.



