कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शेती व्यवसाय हा केवळ पारंपरिक उत्पन्नाचे साधन न राहता, नवनवीन संधी व करिअरचा मजबूत करण्याचा पर्याय ठरत आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. कृषी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात योगदान देण्यासाठी हे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून ते गावागावात पोहचवावे, असे आवाहन सहाय्यक कृषि अधिकारी (खत गुण नियंत्रण) प्रदीप रोकडे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. डी. वाय. पाटील कृषी तंत्र पदविका विद्यालय, तळसंदे येथे आयोजित प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. “शेती क्षेत्रातील भविष्यातील संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोकडे यांनी बदलत्या कृषी क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीचा आढावा घेतला.
कृषी पदविका अभ्यासक्रमानंतर विविध कृषी व्यवसाय, शासकीय सेवा आणि उत्कृष्ट कृषी सल्लागार म्हणून करीअर करणे शक्य आहे. आपण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करावा असे आवाहन रोकडे यांनी यावेळी केले.
यावेळी प्रदीप रोकडे यांचा प्राचार्य प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. श्रीहरी शिंदे यांनी केले. यावेळी प्रा. शांताराम कांबळे, प्रा. स्मित कदम, वर्षा कोंडविलकर यांच्यासह प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी व द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.



