कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने मुंबई, पुणे, पालघर, गोंदिया, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना यांसारख्या जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासनाकडून पूरस्थितीचा इशारा देत सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई, पुणे, पालघर, गोंदिया – रेड अलर्ट
-
पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला असून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पावसाची संततधार सुरू आहे आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वसई-विरार परिसरात अतिवृष्टीचा धोका असून प्रशासनानं घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत.
-
पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता असून रेड अलर्ट लागू आहे.
-
गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट असून बेवारटोला प्रकल्प भरून वाहतोय. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले
-
पहाटे चार वाजता धरणाचे स्वयंचलित गेट क्र. ४ उघडले.
-
धरणातून ( गेट क्र. ३,४,५,६ ) मधून ५७१२ क्युसेक विसर्ग आणि BOT द्वारातून १५०० क्युसेक असा एकूण ७२१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
-
अलमट्टी धरणातून पाण्याचा ८० हजार क्युसेक विसर्ग सुरू
-
पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी २७ फुट ०१ इंच इतकी झाली आहे.
-
जिल्ह्यातील एकूण ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

राधानगरी धरण भरले आहे. काल ( दि.२५ ) रात्री दहा वाजता धरणाचा पहिला स्वयंचलित दरवाजा उघडला. सध्या चार दरवाजे उघडले आहेत. धरणातून सोडलेले पाणी २० ते २२ तासात कोल्हापूर ( कसबा बावडा ) येथील राजाराम बंधाऱ्यापर्यंत येईल. यामुळे पाणी पातळी ६ ते ७ फूट वाढू शकले. पण पूरस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही.
मुंबई, रायगड, जालना, कोल्हापूर, सांगली, सातारा – ऑरेंज अलर्ट
-
मुंबईत ऑरेंज अलर्ट असून सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
-
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर असून ढगफुटीसदृश्य पावसामुळे काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. आज ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.
-
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे प्रशासन सतर्क आहे. काही ठिकाणी वाहतूक मंदावली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूरस्थिती – गडचिरोली, कोकण व पश्चिम महाराष्ट्र धोक्यात
-
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात इंद्रावती व परलाकोटा नद्यांना पूर आला आहे. काल ओसरलेला पूर आज सकाळपासून पुन्हा वाढला आहे. रस्ते बंद असून तालुक्याचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे.
-
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पंचगंगा, वरणा, कृष्णा नद्या भरून वाहू लागल्या असून काही सखल भागात पाणी साचले आहे.
शेतीचं मोठं नुकसान; काही भागात दिलासा
मुसळधार पावसामुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. गोंदिया, जालना, कोल्हापूर भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र काही भागात पावसाचा पुरेसा पुरवठा झाल्याने पेरणी आणि अंकुरणास चालना मिळाली आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरातही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.प्रशासनाकडून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं, नद्या व नाल्यांच्या काठावर न जाण्याचं आणि हवामान खात्याचे अपडेट्स लक्षात घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
—————————————————————————————-



