कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात बोलता बोलता आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर ५०० एकर जमीन असल्याचा गंभीर आरोप केला. यावर आता राजू शेट्टी यांनी थेट आणि धडाकेबाज प्रत्युत्तर देत क्षीरसागर यांना खुलं आव्हान दिलं आहे, ” ५०० एकरचे सातबारे बिंदू चौकात दाखवा, ती संपूर्ण जमीन तुमच्याच नावावर बक्षीसपत्र करतो ! “
राजू शेट्टी सध्या दोन दिवसांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यांबाहेर आहेत. मात्र, त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की, उद्या २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ते स्वतः बिंदू चौकात हजर राहणार आहेत. त्यांनी मागणी केली आहे की, आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या लोकसभेतील विवरणपत्रा व्यतिरिक्त ज्या ५०० एकर जमिनीचा उल्लेख केला आहे, त्याचे सातबारे पुराव्यासकट त्या ठिकाणी सादर करावेत. शेट्टी यांनी सांगितले की, अशा प्रकारची जमीन असल्यास, ती ते क्षीरसागर यांच्या नावावर बक्षीसपत्राने देणार आहेत.
पण, जर राजेश क्षीरसागर बिंदू चौकात दिलेल्या वेळेस आणि दिवशी उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या नावावर असणारी सर्व संपत्ती करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीच्या मंदिराच्या नावे करावी, असेही आव्हान राजू शेट्टी यांनी दिले आहे.
या घमासान आरोप-प्रत्यारोपामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले असून, २६ जुलै रोजी बिंदू चौकात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिकच गहिरं होत चाललं आहे, आणि यातून राजकीय स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमच्या यू ट्यूब चॅनेललाही भेट द्या….👇






