कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी क्षेत्रातील सुधारणा आवश्यक असून गुणवत्ता केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे पुरविणे आवश्यक आहे. कृषी विभागाने गुणवत्ता केंद्रांसह संयुक्तपणे काम करुन शेतकऱ्यांपर्यंत थेट आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवावे. तसेच गुणवत्ता केंद्रांनी परिसरातील पाच गावांतील किमान १५ शेतकऱ्यांची निवड करुन लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष शेतात तंत्रज्ञानाचा प्रभाव पडून उत्पादन वाढीसह शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन इस्त्राईलचे नवी दिल्ली येथील दुतावास (ॲग्रीकल्चर अटॅची) ऊरी रुबीनस्टेन यांनी केले.
पुणे येथील साखर संकुल, शिवाजीनगर येथे गुणवत्ता केंद्रांची आढावा बैठक मराफऔवमंचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल महिंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये इस्त्राईल दूतावासातील अधिकारी, शास्त्रज्ञ आणि गुणवत्ता केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत इंडो-इस्त्राईल आंतरराष्ट्रीय करारानुसार महाराष्ट्रात केशर आंबा गुणवत्ता केंद्र ( हिमायतबाग, जि. छत्रपती संभाजीनगर ), हापूस आंबा गुणवत्ता केंद्र ( दापोली, जि. रत्नागिरी ), संत्रा गुणवत्ता केंद्र ( नागपूर ) आणि डाळिंब गुणवत्ता केंद्र ( राहुरी, जि. अहमदनगर ) अशी चार उत्कृष्ट गुणवत्ता केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
या केंद्रांची निर्मिती राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये केशर व हापूस आंबा, संत्रा आणि डाळिंब या फळपिकांच्या आधुनिक लागवड पद्धतीविषयी शेतकऱ्यांसाठी विविध प्रात्यक्षिके घेण्यात येतात, तसेच ही केंद्रे प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहेत.
गुणवत्ता केंद्रांमार्फत आतापर्यंत एकूण ११ लाख २६ हजार १४४ उच्च प्रतीची कलमे व रोपे तयार करण्यात आली असून १ लाख ११ हजार ३९७ शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय १० हजार ९५ कृषी अधिकारी व १ हजार ९७९ मास्टर प्रशिक्षकांनीही या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.
Inline irrigation system, Raised bed preparation, Y-angle तंत्रज्ञान, मशिनद्वारे छाटणी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके संबंधित केंद्रांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात येत आहेत.
इस्त्राईलचे नवी दिल्ली येथील दुतावास (ॲग्रीकल्चर अटॅची) ऊरी रुबीनस्टेन व प्रकल्प अधिकारी ब्रम्ह देव यांनी राहुरीच्या डाळिंब गुणवत्ता केंद्राला भेट देऊन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. गुणवत्ता केंद्रे शाश्वतपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची सूचना त्यांनी यावेळी दिली होती. या पार्श्वभूमीवर पुणे येथील साखर संकुल येथे गुणवत्ता केंद्रांची आढावा बैठक संपन्न झाली..
—————————————————————————————