पन्हाळा : प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींच्या प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले. यावेळी तालुक्यातून आलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पन्हाळा तालुक्यातील २०२५-३० पंचवार्षिक निवडणूकीसाठी तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींच्या प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने चिठ्ठया टाकून तहसिलदार माधवी शिंदे यांनी निश्चित केले. आरक्षण प्रक्रिया मेमध्ये पार पडली होती. परंतु कोर्टाच्या आदेशानुसार आज फेर आरक्षण प्रक्रिया राबवण्यात आली. ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडील ५ मार्च २०२५ च्या आदीसुचनेनुसार सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारीत तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आणि महिला सरपंच आरक्षित करण्यात निश्चित केले.
१११ ग्रामपंचायतीतील सरपंच पदापैकी अनुसूचित जातीसाठी १६, नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी ३०, सर्वसाधारण करीता ६५ अशा एकुण १११ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत झाली. त्यापैकी महिलांसाठी ५० टक्के आरक्षण निश्चित केले. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित १६ पैकी अनुसूचित जाती महिलांसाठी ८, नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ३० पैकी नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला १५ आणि सर्वसाधारण प्रवर्गामध्ये प्रवर्ग ६३पैकी सर्वसाधारण महिला ३३ अशाप्रकारे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने चिठ्ठया टाकून आरक्षण निश्चित केले.
यावेळी तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाळ, रमेशकुमार नांगरे यासह तालुक्यातून आलेले ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
————————————————————————————–