कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक आणि क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्वे (डीसीएस)’ प्रकल्पाअंतर्गत रब्बी २०२४-२५ आणि उन्हाळी २०२४-२५ हंगामांपासून सुधारित ई-पिक पाहणी प्रणाली राज्यभर अंमलात आणली जात आहे.
या सुधारित प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांची नोंद अधिक सुलभ आणि अचूक पद्धतीने करता यावी, यासाठी मोबाईल अॅपच्या साहाय्याने डिजिटल नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना ४५ दिवसांचा विशेष कालावधी पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीपासून पुढील ४५ दिवसांच्या कालावधीत स्वतः मोबाईल अॅपद्वारे ई-पिक पाहणी नोंद करता येणार आहे. हे तंत्रज्ञान वापरून शेतकरी स्वतःच्या पिकांची माहिती त्वरित आणि अचूक रीतीने सरकारकडे पोहोचवू शकतील.
उर्वरित खातेदारांसाठी अतिरिक्त संधी जे शेतकरी पहिल्या टप्प्यात नोंदणी करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने सहयक स्तरावर आणखी ४५ दिवसांची मुदत जाहीर केली आहे. यामुळे नोंदणी अधिक व्यापक आणि समावेशक होण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर आवश्यक ती तयारी केली असून कृषी विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य दिले जात आहे.
ही सुधारित प्रक्रिया केवळ शेतकऱ्यांच्या सहभागामुळेच यशस्वी होऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी योग्य त्या कालावधीत ई-पिक पाहणी नोंदणी करून या डिजिटल क्रांतीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.