कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यात ते कथितपणे मोबाईलवर ऑनलाईन रमी गेम खेळत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावर मिश्कील भाष्य करत कोकाटेंची पाठराखण केली. “ मी जेव्हा कोकाटे साहेबांना मोबाईलवर पाहिलं, तेव्हा मला वाटलं की ते कुठे क्लबमध्ये जाऊन बसलेत आणि रमी खेळतायत की काय ! लहान मुलं जसं मोबाईलवर काहीतरी करत असतात, तसंच काहीतरी ते करत होते,” असं सांगत त्यांनी थेट आरोपांना खोचक उत्तर दिलं.
कोकाटेंनी स्वतः या आरोपांचं खंडन केलं असून, ” मी गेम खेळत नव्हतो, फक्त अॅपमधील एक जाहिरात स्कीप करत होतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, विरोधकांनी हा युक्तिवाद फेटाळून लावत, ” राज्यात शेतकरी संकटात असताना कृषिमंत्री मोबाईलवर वेळ घालवतायत,” अशी टीका केली आहे.
यापूर्वी देखील कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादात अडकले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली होती की, “बळीराजा हा आपला दैवत आहे, त्यामुळे अशा भाषेचा वापर टाळावा.”
विधिमंडळात सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान घडलेल्या या प्रकारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवेच फाटे फुटले आहेत. एकीकडे कोकाटे यांचं समर्थन करत हसन मुश्रीफ मिश्कील टिप्पणी करतायत, तर दुसरीकडे विरोधकांचा रोष वाढत चालला आहे. यापुढे या वादाचा प्रवाह कुठे वळतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
————————————————————————————



