अनेक चित्रपटात ‘होली ‘वेगवेगळ्या अंदाजात दाखवली गेली . पण चित्रपटाच्या पडद्या बाहेर रंगीत ‘होली ‘साजरी व्हायची ती आर के स्टुडिओ मध्ये खास राज कपूर अंदाजात! रंगांचे मोठ मोठे हौद असायचे, भांग असायची. जोडीला संगीत, नाचणे, खायप्यायची मौज असायची. बॉलीवूड मधील लहान मोठे सर्व स्टार्स, तंत्रज्ञ, कामगार आवर्जून हाजेरी लावायचे . एकमेकाना रंगांच्या हौदात टाकायचे. रंगात न्हाऊन निघायचे. नाचायचे, मस्त दिवसभर मस्तीत असायचे . त्या वेळचे फोटो त्या सर्व लुटलेल्या – साजऱ्या केलेल्या क्षणांची कहाणी सांगतात , लेजेंडरी स्टार्स च्या आठवणी सांगतात. फोटोतले कलाकारच पहिले तर दिसतात राज कपूर, सितारा देवी, नर्गिस , अमिताभ, राजेंद्र कुमार, निरुपमा रॉय, गीता बाली, नीतू सिंग, शंकर जयकिशन, शम्मी कपूर, रणधीर कपूर, ऋषि कपूर, प्रेम चोप्रा, प्रेमनाथ व इतर असंख्य त्यावेळच्या त्या फोटोतले कलाकार, चेहरे रंगात न्हायल्या मुळे ओळखू देखील येत नाहीत पण रंगीत झालेल्या त्या देखण्या चेहऱ्यांवरचा आनंद काही लपत नाही !
रणधीर कपूर त्यावेळच्या आर के स्टुडिओ तील होली विषयी म्हणाला ‘आधी पारंपरिक स्वरूपात होली खूप जोशात आणि मजेत साजरी व्हायची. फार जबरदस्त वातावरण असायचे पण जसे कृत्रिम रंग वापारण्याचे फॅड आले तेव्हा पासून सर्व वातावरण बदलू लागले. या रंगामुळे केस व नखे खराब होत असल्याने हिरोईन्स येईनाशा झाल्या. नवीन पिढीतील हिरॉईन्सनी पाठ फिरवल्यावर मला व ऋषिलाही उत्साह राहीला नाही . पहिली मजा राहिली नाही. निळे पिवळे झालेले चेहरे कोणाचे आहेत ही नंतर ओळखू देखील येत नव्हते. अनोळखी लोक येऊन नंतर याचा गैरफायदा घेऊ लागले. माॅब वाढू लागल्याने नियंत्रणात राहत नव्हता’.
कपूर घराण्यातील तिसऱ्या पिढीचा नायक रणबीर कपूर निर्माता दिग्दर्शक राहुल रवेलशी बोलताना म्हणाला ‘मी त्यावेळी खूप लहान होतो. मी भ्यायचो कारण काळा व इतर रंग फासलेली माणसे भीतीदायक वाटायची. सर्वाना ट्रक मध्ये कोंबायचे. तुमच्याकडेच याच्या चांगल्या आठवणी असतील.’ राहुल रवेल म्हणाले ‘बरोबर आहे. सर्वजण अनेक रंगात न्हाऊन निघायचे. खरोखर दिवस साजरा व्हायचा.’ आख्या फिल्म इंडस्ट्रीत आरकेचीच होळी साजरी व्हायची. कपुरांच दिलखुलास पंजाबी ‘दिल’ मुंबईच्या मुक्त ‘काॅस्मोपाॅलिटन’ वातावरणात ओसंडून वहायच! आणि त्याची लागण सर्वांनाच झालेली असायची.
आता राज कपूर नाही, आर के स्टुडिओ नाही, त्यांच्या काळातले असंख्य कलाकारही नाहीत व त्या वेळची होळीही नाही!