कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात वाघांची संख्या वाढल्याने जंगलालगत राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे गेल्या काही महिन्यांत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत आता ९०० AI आधारित कॅमेरे जंगलाच्या विविध भागांमध्ये बसवले जाणार आहेत. यासाठी मार्वल कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे.
जंगलात ठिकठीकाणी बसविले जाणारे ९०० AI आधारित कॅमेरे वाघांची हालचाल ओळखून तात्काळ अलर्ट देणार असून, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांना वेळेत माहिती मिळेल. या तंत्रज्ञानामुळे वाघांचे अचूक स्थान, त्यांच्या हालचाली आणि जंगलात घडणाऱ्या घडामोडी अधिक चपखलपणे नोंदवता येणार आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये वाघांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे गावाकडे वाघ येत आहेत. गेल्या काही काळात वाघाने अचानक हल्ला केल्याने काही लोकांचा जीव गेलेला आहे. हे तंत्रज्ञान लोकांचा जीव वाचवण्याकरिता आहे. हे तंत्रज्ञान जंगलात वापरले गेले तर मोठ्या प्रमाणात जीवहानी कमी होईल. याचबरोबर जंगलाला लागून असलेली शेतकऱ्यांची जमीन वन्य प्राण्यांमुळे पडीक पडलेली आहे. अशा शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी ५० हजार रुपये एकरी तीस वर्षांसाठी भाडे देणार आहे. या जमिनीवर वनविभाग सोलार प्रकल्प, बांबू लागवडीचे प्रकल्प, ग्रासलँड डेव्हलप करणार आहे.
अलर्ट मिळाल्यामुळे गावकरी सावध होतील: मंत्री जैस्वाल
याबाबत बोलताना राज्यमंत्री आशिष जैस्वाल म्हणाले की, या तंत्रज्ञानमुळे जंगल परिसरात वाघ किंवा बिबट्यांचा आवाज आला तर वन विभागाला अलर्ट पाठवा जाणार आहे, वन्य प्राण्यांमुळे पडीक असलेली जंगल परिसरातील जमिन वन विभाग भाड्याने घेणार आहे, यासाठी शेतकऱ्यांना चांगले पैसे दिले जाणार आहेत.
वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. मिलिंद देशमुख यांनी सांगितले की, वाघांचे संवर्धन हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लोकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले पाहिजे. AI कॅमेऱ्यांमुळे मानवी हस्तक्षेप न करता निरीक्षण शक्य होईल.
——————————————————————————————————–