कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाचे समरजितसिंह घाटगे पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या भेटींमुळे त्यांच्या राजकीय पुनरागमनाच्या चर्चा अधिकच गडद झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर काही काळ राजकीय अज्ञातवासात गेलेले घाटगे सध्या ‘घरवापसी’च्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र या भेटी “घरवापसी”च्या अनुषंगाने झाल्या का, की काही वैयक्तिक किंवा अन्य राजकीय कारणांमुळे, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही.
समरजितसिंह घाटगे यांच्या या हालचालींमुळे कागलमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समरजितसिंह हे माजी मंत्री आणि राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचं महत्त्व कायम आहे. भाजपमध्ये त्यांचा पुनर्प्रवेश झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची स्थानिक ताकद अधिक बळकट होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, घाटगे यांच्या हालचालींवर औपचारिक शिक्कामोर्तब झाल्याशिवाय पुढील राजकीय दिशा ठरवणे कठीण असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
———————————————————————————–