कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त नृसिंहवाडी येथे आज दत्तभक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यातूनही हजारो भाविकांनी दर्शनासाठी येथे हजेरी लावली.
श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात आज गुरुपूजन, अभिषेक, पूजा व विविध धार्मिक विधी अत्यंत भक्तिभावाने पार पडले. श्री गुरुदेव दत्ताच्या गजरांनी परिसर दुमदुमून गेला होता. कृष्णा – पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी स्नान करून तीर्थात पूजन केले व दत्तमंदिरात श्रींचे दर्शन घेतले.
या वेळी मुख्य मंदिरातील स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्यामुळे श्रीं ची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली होती. तेथे दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. दररोजच्या तुलनेत आज मंदिरात भाविकांची गर्दी अधिक असल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन व प्रवचनांनी भक्तांचे मनोबल वाढवले. स्थानिक प्रशासन व मंदिर समितीने गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवत भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था केली होती.