मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील राजकारण सध्या प्रचंड अस्थिरतेच्या टप्प्यावर असून महाविकास आघाडीकडून महायुतीला कोंडीत पकडण्याचे काम सुरू आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल, ठाकरे बंधूंमधील कमी होत चाललेले अंतर, विविध पक्षांतील अंतर्गत मतभेद यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण रोज नवे वळण घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ९ जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय भाजप नेत्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. अधिकृतरित्या ही भेट गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘सदिच्छा भेट’ असल्याचं सांगण्यात येत असलं, तरीही या भेटीमागील खरा उद्देश काय होता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील अंतर्गत घडामोडी, ठाकरे बंधूंचे अचानक वाढलेले राजकीय संपर्क, उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संभाव्य ‘बॅकडोअर डायलॉग’, तसेच नवी जागावाटप रचना या सर्व मुद्द्यांवर एकनाथ शिंदेंनी केंद्राकडे आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे गटाला भविष्यातील सत्ता समीकरणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेषतः, ठाकरे गटाच्या संभाव्य युती हालचाली, राष्ट्रवादीत अजित पवार गटाची धुसफूस, आणि काँग्रेसमध्येही असलेल्या अंतर्गत मतभेदांचा फायदा घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट नव्याने रणनीती आखत असल्याचे संकेतही काही विश्लेषक देत आहेत. त्यामुळेच शिंदे यांच्या या भेटी केवळ औपचारिक नव्हत्या, असा अंदाज बळावतो आहे.
राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याचे भविष्यातले राजकीय पडसाद काय उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही भेट एखाद्या मोठ्या राजकीय फेरबदलाची नांदी ठरेल का, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, एवढं नक्की शिंदे यांच्या दिल्ली भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय तापमान आणखी वाढणार आहे !
यावरही एक नजर….👇