मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा वरवंटा मागे घेतल्यानंतरही पडद्याआडून महायुती सरकार कडून मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा डाव सुरू असल्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर नेमलेली डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी आज आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन होत आहे. आंदोलनाला विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दिग्गजांनी पाठिंबा दिला आहे.
समितीवरुन सरकारवर निशाणा
सरकारने नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीकडे मराठी समाज मोठ्या शंकेने पाहत आहे. नरेंद्र जाधव यांचा अर्थतज्ज्ञ म्हणून लौकिक असला तरी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञता नसताना त्यांच्याकडे संवेदनशील शालेय शिक्षणाच्या विषयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा आजवरचा इतिहास पाहता ते सरकारधार्जिणे असून नेहमी सत्ताधाऱ्यांची भलामण करणारे म्हणून ओळखले जातात, असा आरोप सातत्याने होत आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही लक्ष वेधले असून, राज ठाकरे यांनीही नरेंद्र जाधव यांना मराठी जनतेच्या रोषाची जाणीव असावी, असा सूचक इशारा दिला आहे.
या मान्यवरांचा आंदोलनाला पाठिंबा :
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, विजय वडेट्टीवार- काँग्रेस, डॉ. भालचंद्र मुणगेकर- शिक्षणतज्ज्ञ, प्रकाश रेड्डी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष- डॉ. अजित नवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, हेमंत गोखले, माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय, मीना गोखले, निखिल वागळे-ज्येष्ठ संपादक, राजन गवस- ज्येष्ठ साहित्यिक, सुमीत राघवन- अभिनेता, युवराज मोहिते- सामाजिक कार्यकर्ते, दीपक राजाध्यक्ष, प्रशांत कदम- मुक्त पत्रकार, वैभव छाया- मीडिया कन्सल्टंट, वरुण सुखराज- दिग्दर्शक, पैगंबर शेख- सामाजिक कार्यकर्ते
या संस्था आंदोलनात सहभागी :
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, आनंद निकेतन, नाशिक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ, आम्ही शिक्षक सामाजिक संस्था, कायद्याने वागा लोकचळवळ, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र, मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य, मराठी बोला चळवळ, ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’ फेसबुक समूह, इंडी जर्नल, ‘भाषा अशा कशा’ यूट्यूब चॅनेल, भारतीय विवेकवादी व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य, ज्योती सावित्री प्रबोधिनी, स्वायत्त महाराष्ट्र अभियान, तोडकं मोडकं नाट्यसंस्था
प्रमुख मागण्या- नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करा, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता कायम ठेवा, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि एससीआरटी संचालक राहुल रेखावार यांची हकालपट्टी करा, प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा सक्ती नको.
आंदोलनात सहभागी झालेल्या मान्यवरांनी सरकारवर सडकून टीका केली असून, मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे सरकारने तात्काळ निर्णय बदलावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. आझाद मैदानात मोठ्या संख्येने नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित असून वातावरण तणावपूर्ण असले तरी आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे.
———————————————————————————————



