कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
एकात्मता म्हणजे एकोप्याची भावना! ही भावना वारीमध्ये पदोपदी आढळते. वारीच्या केंद्रस्थानी एकात्मता ही महत्त्वाची संकल्पना आहे. वारी म्हणजे फक्त धार्मिक यात्रा नाही; ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे. जी संतांनी मांडलेल्या विचारांवर आधारित आहे. वारीत एकात्मतेचं मूर्त रूप दिसून येतं — इथे वर्ण, जात, धर्म, लिंग, वय, आर्थिक स्थिती या कोणत्याही भेदांनाही स्थान नसतं.
वारीत एकात्मता अशी असते :
समानता आणि समता: वारीत सहभागी होणारे सर्व वारीकरी ‘माऊली’ म्हणून ओळखले जातात. कुणी श्रीमंत असो, गरीब असो, ब्राह्मण असो की कुणबी, सर्वजण एकाच ओळखीने सहभागी होतात. कोणी श्रेष्ठ-कोणी कनिष्ठ नाही.
भोजन आणि निवासात एकोप्याची भावना : वारीमध्ये लोक एकत्र जेवतात, झोपतात, आंघोळ करतात. कोणतीही जातिभेदाची भावना नसते.
सेवा आणि सहभाग:वारीत अनेकजण स्वयंस्फूर्तीने सेवा करतात. कोण पाणी वाटतो, कोण शौचालय स्वच्छ करतो, कोण पादुका डोईवर घेतो. कुणी कोणासाठी करतो हा प्रश्नच नसतो — सर्व एकमेकांचे भक्त, सेवक आणि सहकारी असतात.
भक्तीमध्ये एकात्मता: भक्ती ही सर्वांच्या हृदयात एकच गोष्ट जागवते. भगवंतावरील प्रेम आणि एकमेकांवरील आपुलकी. हेच वारीत एकात्मतेचं मुळं आहे.
संतांचा संदेश: संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई अशा संतांनी समाजातील विषमता नष्ट करून ‘विठोबा’ हे एक समान श्रद्धास्थान सगळ्यांसाठी निर्माण केलं.
ध्वज, टाळ, मृदुंग आणि अभंग यांतून एकतेचा नाद: संपूर्ण वारी टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगाच्या ओघात पुढे सरकते. प्रत्येक पावलावर ‘माऊली’ असा एकच उच्चार — यातून समूहभावना आणि अध्यात्मिक एकात्मता प्रकट होते.
आज जात, धर्म, भाषा, वर्ग अशा अनेक बाबतीत समाज विभागला गेला आहे. अशा वेळी वारी सर्वांना जोडणारा एक पुल आहे. ही प्रेम, सहिष्णुता आणि बंधुभावाची शिकवण आज अत्यंत गरजेची आहे.






