मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान निश्चितच खपवून घेतला जाणार नाही. कोणी जर मराठी बद्दल अपशब्द काढणार असेल तर ते चालणार नाही मात्र त्या सोबतच राज्यातील कायदा व्यवस्था बिघडणार नाही याची सुद्धा खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान भवन परिसरात व्यक्त केली आहे.
मीरा भाईंदर येथील केडिया या व्यापाऱ्याने आपण मराठी बोलणार नाही असे म्हटल्यानंतर मनसेने धमकी दिल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कदम म्हणाले की, महाराष्ट्रात राहायचे तर मराठी शिकावी लागेल, मराठीचा अपमान खपवून घेणार नाही मात्र त्यासाठी जर कोणी कायदा हातात घेण्याची भाषा करत असेल तर त्याबाबतही योग्य दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे हे राज्याचे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठी भाषेसाठी आणि मराठी तरुणांसाठी काय केले हे स्पष्ट करावे, आता केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये वाद निर्माण करून मराठी मते एकवटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोलाही कदम यांनी लगावला.
मनसेचा वापर करण्याचा प्रयत्न
येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबई उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा धुव्वा उडणार आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी आता मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण अशा वेळेस केवळ मनसेचा वापर करून काही जागा पदरात पाडण्यासाठीच केवळ हा मराठी भाषिकांचा नवा मुद्दा पुढे केला जात असल्याची टीकाही कदम यांनी केली.
—————————————————————————————



