थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भव्य अनावरण

 अमित शहांच्या भाषणात इतिहासाच्या पराक्रमाला सलाम

0
108
Google search engine

पुणे : प्रसारमाध्यम न्यूज

आज खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडलं. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ हे खास उपस्थित होते.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे साडेतेरा फूट उंचीचा हा देखणा पुतळा उभारण्यात आलाय. तब्बल चार हजार किलो ब्राँझ वापरून प्रसिद्ध शिल्पकार विपुल खटावकर यांनी हा पुतळा तयार केलाय.
अमित शहा यांनी भाषणाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आणि पुढे बोलताना म्हटलं, ” युद्धाच्या कलेचे काही नियम काळ बदलला तरी ते बदलत नाहीत. व्यूहरचना, त्वरा, समर्पण आणि बलिदान हीच विजय मिळवून देणारी शिदोरी असते. आणि या सगळ्याचं सर्वोच्च उदाहरण आपल्याला थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यात दिसतं.”

बाजीरावांनी लढाईचे चित्र बदललं

शहा पुढं म्हणाले, “अनेक लोक म्हणतात, जर पेशव्यांनी शिवरायांनी सुरू केलेली स्वातंत्र्याची चळवळ पुढं नेली नसती, तर आज भारताचं खरं रूप असंच टिकून राहिलं नसतं. ज्या लढाया पराभव निश्चित मानल्या जात होत्या, त्या थोरल्या बाजीरावांनी आपल्या धाडसातून आणि रणनितीतून जिंकून दाखवल्या. पालखेडच्या लढाईचा इतिहास नीट वाचला, तर कळतं की निजामासमोर मिळवलेला तो विजय खरंच अकल्पनीय होता. पण बाजीराव थकले नाहीत, थांबले नाहीत आणि गुलामीची सगळी चिन्हं त्यांनी संपवली.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” एनडीएमधल्या प्रत्येक तरुणासाठी थोरले बाजीराव पेशवे हे युद्धनीती, धैर्य आणि देशभक्तीचं मोठं उदाहरण आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.” पुतळ्याच्या अनावरणानंतर उपस्थित सगळ्यांनी शिल्पकार विपुल खटावकर यांचं कौतुक केलं आणि बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाला सलाम ठोकला.

——————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here