पंढरपूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आषाढी एकादशी येत्या रविवारी (६ जुलै ) होत असून, त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात भक्तांचा महासागर लोटला आहे. सध्या विठोबाच्या दर्शनासाठी तब्बल ५० हजार भाविक रांगेत उभे असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. एकादशीला अजून दोन दिवस बाकी असूनही, गोपाळपूरपर्यंत रांग पोहोचली आहे.
विठ्ठल मंदिरापासून ५ किमी अंतरापर्यंत रांगेचा विस्तार झाला आहे. सद्यस्थितीत पदस्पर्श दर्शनासाठी किमान १५ तासांचा कालावधी लागत आहे. रविवारी मुख्य एकादशीचा सोहळा असल्यानं, त्या आधीच इतकी गर्दी पाहायला मिळणं हे या वर्षीचं विशेष लक्षवेधी चित्र आहे.
पालख्या आगमनाची तयारी पूर्ण
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या उद्या (५ जुलै) पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर वारकऱ्यांची गर्दी आणखी वाढणार आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था युद्धपातळीवर व्यवस्था करत आहेत.
रांग व्यवस्थापन
-
रांग व्यवस्थापनासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षा तैनात केली आहे.
-
पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, आरोग्य सुविधा आणि आरामासाठी शेड्स उभारण्यात आले आहेत.
-
वारकऱ्यांच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.
-
प्रवास व दर्शनाच्या मार्गावर स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत.
प्रशासनाचे आवाहन
-
भाविकांनी संयम राखावा व प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात.
-
पाणी, औषधे आणि आवश्यक वस्तू स्वतःसोबत ठेवाव्यात.
-
वृद्ध, लहान मुले आणि महिला यांची विशेष काळजी घ्यावी.
अशा परिस्थितीत रविवारी एकादशीचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. मात्र, गर्दीचा अंदाज पाहता भाविकांनी नियोजनपूर्वक दर्शनासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
—————————————————————————————-