कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी शहरात काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक लावल्याने राजकीय चर्चांना नवा रंग चढला आहे.
देशमुख यांनी गेल्या आठवड्यातच मुंबईत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या सोबत काही काँग्रेसमधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मालोजीराजेंचे समर्थक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे देशमुख यांनी लावलेला शुभेच्छा फलक चर्चेचा विषय ठरत आहे.
मालोजीराजे छत्रपती देखील शिंदे गटात प्रवेश करणार का ? असा सवाल स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे, नुकतेच ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीवरून नाराज झालेल्या संजय पवार यांनी थेट मालोजीराजेंवर आणि त्यांच्या गटावर गंभीर आरोप केले होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची उमेदवारी ही विरोधकांच्या फायद्यासाठी होती, असा आरोप पवार यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या शुभेच्छा फलकामुळे चर्चांना उधाण आले असून, शहरातील राजकीय वर्तुळात मालोजीराजेंच्या पुढील भूमिकेबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. मात्र, अद्याप मालोजीराजे किंवा त्यांच्या गटाकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
कोल्हापुरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे.
——————————————————————-