मुंबई : विशेष वृत्तसेवा
राज्य परिवहन महामंडळाच्या ( एसटी ) गंभीर आर्थिक परिस्थितीवरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांनी आज विधान परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. एसटीचा संचित तोटा तब्बल १० हजार ९०० कोटींवर पोहोचला आहे, हे उघड करत परब यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही कडाडून टीका केली.
परब म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांच्या आधी एसटी जगली पाहिजे. पण काही लोकांनी कर्मचाऱ्यांच्या गळ्यावर सूरी फिरवून एसटी संपवण्याचं पाप केलं.” त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि कर्मचाऱ्यांना भडकावल्यामुळेच पाच महिने एसटी बंद राहिली आणि हजारो कर्मचारी कर्जबाजारी झाले, असा आरोपही त्यांनी केला.
सदाभाऊ खोतांची आठवण
परब यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला. “सदाभाऊ खोत १५ दिवस आझाद मैदानात जाऊन झोपले होते आणि म्हणाले होते, जोपर्यंत एसटी कर्मचारी शासकीय कर्मचारी होत नाहीत, तोपर्यंत एसटीचं एक चाकही बाहेर पडू देणार नाही. पण आता त्या लोकांची वाचा गेली कुठे? आता ताटाखालची मांजर होऊन गप्प का बसलेत?” असा सवाल परब यांनी उपस्थित केला.
पाच महिन्यांचा पगार नाही
परब पुढे म्हणाले, “बंद काळातील पाच महिन्यांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. एका महिन्याचा पगार मिळाला तरी कर्मचारी सावकाराकडे जातात, पण पाच महिने एसटी बंद ठेवण्याचं पाप या लोकांनी केलं. कर्मचाऱ्यांना आमिष दाखवण्यात आलं, त्यांना भडकावण्यात आलं, त्यामुळेच पाच महिन्यांचा संप झाला.”
अधिकाऱ्यांचे सिंडिकेटही जबाबदार
परब यांनी केवळ राजकीय नेतृत्वावर नाही, तर एसटीमधील अधिकाऱ्यांच्या सिंडिकेटवरही बोट ठेवलं. “एसटी खड्ड्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांचंही सिंडिकेट जबाबदार आहे.” असं म्हणत त्यांनी कारभारावर टीका केली.
एसटीच्या प्रश्नावरून अनिल परब यांनी थेट भाजप आमदार आणि माजी मंत्री यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एसटीच्या सध्याच्या गंभीर आर्थिक परिस्थितीवरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग होणार हे निश्चित आहे.
————————————————————————————–