मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ ने अल्पावधीतच महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विविध भागांतून आलेल्या प्रतिभावान कीर्तनकारांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सादरीकरणातून प्रेक्षकांना आणि परीक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण राज्यात कीर्तन परंपरेचा उत्सव साजरा होत आहे.
या शो च्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक उत्तम कीर्तनकारांपैकी सहा सर्वोत्तम स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली आहे. प्रत्येकाच्या सादरीकरणातून संतवाणी, भक्ती, श्रध्दा आणि सामाजिक संदेशांचा संगम अनुभवायला मिळाला आहे.
पंढरपूरच्या वारीचा सोहळा, हरिनामाचा गजर, टाळमृदंगाचा नाद आणि भक्तिभावाने भारलेलं वातावरण यंदा घरबसल्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाचा बहुप्रतिक्षित अंतिम सोहळा येत्या आषाढी एकादशीच्या पावन दिवशी रंगणार आहे.
या विशेष सोहळ्यात अंतिम सहा कीर्तनकार आपली प्रतिभा सादर करणार असून, महाराष्ट्राला त्यांचा ‘लाडका कीर्तनकार’ मिळणार आहे. त्यामुळे भक्तिरसात न्हालेल्या या सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ६ जुलै रोजी सोनी मराठी वाहिनीवर हा सोहळा प्रक्षेपित होणार आहे.
———————————————————————————————



