मुंबई : विशेष प्रतिनिधी
हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी विजय उत्सव साजरा करण्याचे ठरवले असले तरी पक्षात असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना खूप छळले आहे अशी आठवण भाजपचे खासदार नारायण राणे यांनी करून दिली. राज यांना पक्ष सोडण्याची इच्छा नव्हती मात्र त्यांना उद्धव यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला.
येत्या पाच जुलै रोजी मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याबद्दल करण्यात येणाऱ्या विजयोत्सवा संदर्भात नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. या मेळाव्याचे जाहिराती वातावरण तयार करण्यात येत आहे मात्र मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच हिंदी सक्तीचा निर्णय केला होता उलट आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो रद्द केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी मेळावा कसला करता? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.
सत्तेमध्ये असताना त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ होते मात्र तेव्हा त्यांना मराठी आठवली नाही मुंबईत आता फक्त १८ % मराठी उरलेत १९६० मध्ये ६० टक्के मराठी भाषिक होते. उद्धव ठाकरे केवळ दोन दिवस मंत्रालयात आले मात्र त्यांनी तरुणांच्या रोजगारासाठी काही केले नाही, असेही राणे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली शिवसेना डुप्लिकेट असून एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेनाच ओरिजनल असल्याचा दावाही राणे यांनी केला.
बॉम्बे स्कॉटिश मध्ये का शिक्षण ?
मराठी भाषेचा आणि मराठी भाषिकांचा आता पुळका आल्याचे उद्धव ठाकरे दाखवत आहेत मग त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश या शाळेत का केले? त्याला मराठी शाळेत का टाकले नाही. शरद पवार आणि काँग्रेस सोबत जाताना ठाकरे यांना मराठीची आठवण झाली नाही का असा सवाल ही राणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
—————————————————————————————



