Ravindra Chavan is the new state president of Maharashtra BJP.
मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. रविंद्र चव्हाण यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा घेतली आहे. मुंबईत झालेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. रविंद्र चव्हाण यांच्याकडे या आधी भाजपचे राज्य कार्याध्यक्षपद होते. त्यांच्या संघटन कौशल्यावर पक्षश्रेष्ठींना विश्वास असल्यानेच पक्षाच्या अत्यंत महत्वाच्या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास
रविंद्र चव्हाण यांचा जन्म २० सप्टेंबर १९७० रोजी झाला. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. २००२ मध्ये भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
२००५ मध्ये ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००७ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असतानाही ते भाजपचे नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले. यामध्ये त्यांच्या नेतृत्वगुणांची छाप पडली.
२००९ मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून भाजपने रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सातत्याने प्रगती झाली आहे. २०१४ मध्ये दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून येत त्यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली.
प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या खांद्यावर भाजपच्या आगामी संघटनात्मक आणि निवडणूक रणनीतीची मोठी जबाबदारी आली आहे. राज्यातील आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या निवडीमुळे पक्षात नवचैतन्य येईल आणि भाजप राज्यात अधिक बळकट होईल, असा पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे.