मुंबई : विशेष प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि त्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. ठाकरे गटाला पक्ष फुटीचा मोठा फटका बसला. स्थानिक पातळीवर शाखा, कार्यालये, निधी आणि पक्षाच्या मालमत्तांवर नियंत्रणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट सावध झाला असून भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ‘शिवकोष – शिवसेना विश्वस्त संस्था’ या नव्या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेमार्फत पक्षाच्या आर्थिक स्रोतांचे व्यवस्थापन, शाखा आणि कार्यालयांच्या मालमत्तेवर नियंत्रण तसेच निधीच्या वाटपावर पारदर्शकता राखली जाणार आहे.
काय आहे ‘शिवकोष’?
‘शिवकोष’ ही शिवसेनेच्या विश्वस्त संस्थेच्या स्वरूपात कार्यरत राहणार आहे. या संस्थेअंतर्गत पक्षाची आर्थिक घडी मजबूत ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानिक शाखा, कार्यालये यांच्यासाठी आवश्यक निधी, त्यांचे व्यवस्थापन, मालमत्ता आणि त्यावर होणारे खर्च यांचे संपूर्ण लेखापरीक्षण ‘शिवकोष’ मार्फत केले जाणार आहे. यामुळे पक्षाच्या मालमत्तांवर कोणीही व्यक्तिगत हक्क सांगू शकणार नाही आणि भविष्यात फूट पडली तरी पक्षाचा आर्थिक डोलारा सुरक्षित राहील, असा शिंदे गटाचा दावा आहे.
‘शिवकोष’ अंतर्गत पुढील कामे केली जाणार :
-
राज्यभरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालये आणि शाखांचे व्यवस्थापन – पक्षाच्या प्रत्येक कार्यालयाच्या जागा आणि मालमत्तांचे विश्वस्त संस्थेच्या मार्फत व्यवस्थित नोंदणी व व्यवस्थापन केले जाणार आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत पक्षाच्या मालमत्तांवर ताबा अबाधित राहील.
-
पक्ष निधीचे योग्य नियोजन आणि वापर – शिवसेनेच्या विविध स्रोतांमधून येणाऱ्या निधीचा योग्य, पारदर्शक आणि नियोजित वापर सुनिश्चित केला जाणार आहे. निधीच्या वाटपात गोंधळ किंवा वाद निर्माण होणार नाही, यासाठी कठोर नियमन ठेवण्यात येणार आहे.
-
गरजू कार्यकर्त्यांना मदतीचे वाटप – पक्षातील निष्ठावान आणि गरजूंना आर्थिक किंवा इतर स्वरूपात मदत देण्यासाठी ‘शिवकोष’चा वापर केला जाणार आहे. यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असलेला असुरक्षिततेचा भाव कमी होईल.
-
शिवसेनेच्या सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांचे नियोजन – विविध सामाजिक उपक्रम, मदत मोहिमा, आरोग्य शिबिरे, शिक्षणविषयक उपक्रम यांचे नियोजन व अंमलबजावणी ‘शिवकोष’ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाची जनसंपर्क यंत्रणा अधिक मजबूत होईल.
शिंदे गटात देखील फूट पडणार असल्याची चर्चा विरोधकांकडून सातत्याने केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील नेत्यांनी स्पष्ट केले की, ” पक्षातील एकी टिकवण्यासाठी आणि भविष्यात कोणत्याही प्रकारची अनावश्यक उलथापालथ टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. शिवसेना मजबूत ठेवणे आणि जनतेचा विश्वास कायम राखणे हा आमचा उद्देश आहे.”
—————————————————————————————–



