मुंबई : विशेष प्रतिनिधी
त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा सक्तीची करण्या विरोधात मराठी माणसाने बुलंद केलेला आवाज पाहता राज्य सरकारने जीआर रद्द केला आहे. या शक्ती विरोधात दोन मराठी माणसे एकत्र येतील या भीतीने सरकारने हा जीआर रद्द केल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवन परिसरात व्यक्त केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारला जी आर रद्द करावा लागल्याने रविवारी जय महाराष्ट्राचा नारा बुलुंद झाला. शिवसेनेसोबत काही पक्ष पक्षभेद विसरून एकत्र आले. हिंदी सक्तीची जीआर रद्द केला नसता तर ५ तारखेच्या मोर्चात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटातलेही सहभागी होणार होते, असेही ठाकरे म्हणाले.
मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलिकडे असायला हवे. नरेंद्र जाधव यांची समिती नेमली आहे. मात्र, सरकारने ही थट्टा करू नये शिक्षणाच्या समितीवर अर्थतज्ञ बसवला आहे. आता सक्तीवर पुढे काहीही सरकारने करू नये आपण जरा विखुरले आहोत हे लक्षात आल्यावर मराठी द्रोही एकत्र आले, मात्र त्यांचा फणा आम्ही दाबला. मराठी एक येऊ नये म्हणून त्यांना जीआर रद्द करावा लागला, गिरणी कामगारांच्या समितीने ही भेट घेतली आहे. ही कमळी नेमकी कुठलया भाषेतून शिकली. मार्क पडले शंभर कमळी आमची एक नंबर आता हे शंभर नंबर नेमके कसे पडले की इथेही ईव्हीएमचा वापर केला हे पहावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले.
मी मराठी टोपी बावनकुळे यांच्या डोक्यावर
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच हिंदी शक्ती जीआर रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर मी मराठी लिहिलेल्या टोप्या घालून जल्लोष व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे समोर आले असता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या डोक्यावर मी मराठीची टोपी घातली. त्यांनीही दोन मिनिटे टोपी घालून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनीही बावनकुळे यांना हस्तांदोलन करीत जीआर रद्द केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
——————————————————————————————



