spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअध्यात्मपंढरपूर दर्शनासाठी आता व्हीआयपी दर्शन बंद : आदेश जारी

पंढरपूर दर्शनासाठी आता व्हीआयपी दर्शन बंद : आदेश जारी

नियम तोडल्यास थेट कारवाई

पंढरपूर : विशेष प्रतिनिधी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनासाठी हजारो भाविक दररोज रांगेत उभे असतात. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शनावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. यामुळे आता कोणालाही इतर मार्गाने किंवा व्हीआयपी प्रवेशाद्वारे दर्शन देण्यात येणार नाही. आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर थेट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत (Disaster Management Act) कारवाई करण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशाराही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

सामान्य भाविक तासनतास रांगेत उभे राहतात, मात्र, व्हीआयपी दर्शनासाठी काही निवडक लोकांना बायपास मार्गाने किंवा इतर प्रवेशद्वारांतून थेट मंदिरात प्रवेश दिला जातो. यामुळे रांगेतील भाविकांमध्ये अस्वस्थता, असंतोष निर्माण होतो, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे सर्व भाविकांना समानतेनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं दर्शन मिळावं, यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
आदेशात नेमकं काय म्हटलंय ?
  • कोणत्याही व्यक्तीस, अधिकाऱ्यास किंवा इतर कोणालाही व्हीआयपी पद्धतीने दर्शनासाठी थेट प्रवेश देण्यात येऊ नये.

  • केवळ अधिकृत दर्शन मार्गातूनच सर्व भाविकांनी दर्शन घ्यावं.

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल.

  • यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

प्रशासनाची तयारी
दरवर्षी आषाढी वारीला लाखो भाविक पंढरपूरला येतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था, गर्दी नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था यासाठी प्रशासन सज्ज आहे. यंदा कोणत्याही प्रकारचं भेदभावात्मक दर्शन न होऊ देता सर्वांना एकसमान आणि शांततेत दर्शन मिळावं यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
भाविकांचे समाधान
हा निर्णय सामान्य भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे “सर्वांसाठी एकसमान व्यवस्था” ही संकल्पना प्रत्यक्षात येईल. अनेक वर्षांपासून व्हीआयपी दर्शनाच्या कारणास्तव सामान्य भाविकांना ताटकळत थांबावं लागत होतं, त्यामुळे या निर्णयाचं स्वागत होत आहे.

पंढरपूर वारी ही भक्ती, समता आणि संयमाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे प्रशासनाचा निर्णय सामान्य भाविकांच्या हिताचा असून, यामुळे “कोणतीही विशेष वागणूक नाही, सर्वांना समान संधी” या तत्वाला बळ मिळेल. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला भाविकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. येत्या आषाढी वारीमध्ये कोणतीही अडचण, असंतोष किंवा गोंधळ टाळण्यासाठी सर्व भाविकांनी संयम बाळगून प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments