कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
हवामान विभागानं दिलेल्या प्राथमिक निरीक्षणावरून कोकण व राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पुढील काही दिवस अशाच प्रकारची हवामान परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि इतर घाट क्षेत्रांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात गेल्या २४ तासांत काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली असून, नद्यांचे पाणीपातळी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने त्या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढू शकतो.
नागरिकांना प्रशासनाचा इशारा:
-
नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावं.
-
पावसात अनावश्यक प्रवास टाळावा.
-
विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडांखाली थांबणं किंवा मोबाईलचा वापर करणं टाळावं.
-
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास कोकण, घाटमाथा आणि काही अंतर्गत भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं आणि हवामान विभागाच्या सूचना पाळणं गरजेचं आहे.
अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे राहणार आहेत. कोकणाला या जोरदार पावसाचा तडाखा बसेल असं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण विदर्भ, रायगड, पुणे, उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.