नवी दिल्ली : प्रसारमाध्यम न्यूज
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आज राजधानी दिल्लीत आयोजित झालेल्या बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, नेत्या यशोमती ठाकूर तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे उपस्थित झाले आहेत.
मुंबईसह इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर बैठकीमध्ये भर दिला जाणार आहे. यासोबतच पक्ष संघटनबळ वाढवण्यासाठी काँग्रेसने २०२५ हे वर्ष ‘संघटन पर्व’ म्हणून घोषित केलं आहे. या अंतर्गत राज्यभरात काँग्रेस पक्षाची धुरा नव्या दमाच्या नेतृत्वाकडे सोपवण्याची शक्यता असून, अनेक नेत्यांवर नवीन जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या दिशेने वाटचाल करताना काँग्रेस पक्षासाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे, असे राजकीय वर्तुळांत बोलले जात आहे. संघटनबळ वाढवणे, गटबाजी संपवणे आणि जनतेशी थेट संपर्क वाढवणे हे या बैठकीचे प्रमुख अजेंडे असल्याचे सूत्रांकडून समजते.
राज्याच्या राजकारणात काँग्रेसचे स्थान पुन्हा भक्कम करण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून ठोस निर्णय होण्याची शक्यता असून, याचे पडसाद आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर उमटल्याशिवाय राहणार नाही. राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजवणारी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे पडसाद उमटवणारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद आज पार पडली. मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यापासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर सरकारच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत विविध मुद्द्यांवर सपकाळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मराठी ही भाषा नव्हे, संस्कृती !
“मराठी ही फक्त भाषा नाही, ती एक संपूर्ण संस्कृती आहे. तिच्यावर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. आम्ही भाजपला याच्याशी खेळू देणार नाही,” असा ठाम इशारा देत सपकाळ यांनी सांगितले की हिंदी सक्तीबाबतचा निर्णय (GR) म्हणजे समाजाच्या भावना तपासण्याचा भाजपचा प्रयोग होता. “हे वादळ मुद्दाम निर्माण करण्यात आलं. भाजप सरकार ‘बंच ऑफ थॉट’च्या विचारसरणीवर चालत असून विविधतेतील एकता नष्ट करण्याचा डाव आखत आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
निवडणुकीतील आश्वासनांचे काय ?
सपकाळ यांनी सरकारच्या निवडणुकीपूर्वीच्या घोषणांवरही प्रश्न उपस्थित केले. “शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असं सरकारने निवडणुकीत सांगितलं होतं, त्याचं काय झालं? लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देणार होते, त्याचं काय?” असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर सवाल उभे केले. “हे सरकार मुके, बहिरे आणि आंधळे आहे,” अशी जहाल टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.
कृषी मंत्री नामधारी ? खरा निर्णयकर्ते कोण ?
कृषी मंत्री दादा भुसे यांच्या एका निर्णयाच्या अनुषंगाने सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. “भुसे हे फक्त नावापुरते मंत्री आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली गेली. हे सगळं देवेंद्र फडणवीस आणि एका अधिकाऱ्याने केलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याची काहीच माहिती नव्हती,” असा गौप्यस्फोट करत त्यांनी सरकारच्या अंतर्गत कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. महापालिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांच्या या टीका सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
—————————————————————————————-



